ठाकरे-फडणवीस आमने-सामने; हसले, बोलले, गप्पा मारत विधानभवनात गेले!
– सुधीर मुनगटीवारांची उद्धव ठाकरेंना साद, अजूनही वेळ आहे, एकत्र या!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – गेल्या नऊ महिन्यांच्या टोकाच्या द्वेषाच्या राजकारणात आज थोडे हलकेफुलके क्षण मुंबईत अनुभवायला मिळाले. विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवता एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेहर्यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळात गेले. त्यामुळे अनेक चर्चा उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारानंतर सभागृहातही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे का होईना, परत येण्याची साद घातली. अजूनही काही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एकाचवेळी विधानभवनाच्या आवारात प्रवेश केला. गेल्या काही काळात निर्माण झालेल्या वितुष्टामुळे हे दोन्ही नेते एकमेकांकडे तोंड फिरवून पुढे निघून जातील, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्यात सारे काही सुरळीत आहे, अशा अविभार्वात एकमेकांनी मनमोकळेपणाने गप्पा मारायला सुरुवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत विधिमंडळाच्या दिशेने चालत गेले. यादरम्यानच्या काळात फडणवीस आणि ठाकरे यांच्या हालचालींमध्ये एकमेकांशी बोलताना कुठलाही अवघडलेपणा जाणवत नव्हता, किमान त्यांनी तो जाणवून दिला नाही. अगदी २०१४ नंतर दोन्ही नेत्यांमध्ये ज्याप्रकारचे सख्य होते, त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलताना दिसले. फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की पूर्वी खुलेपणा होता. पण हल्ली बंददाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते असे म्हणतात. त्यामुळे जेव्हा कधीतरी, कदाचित आमची बंद दाराआड चर्चा झाली तर त्यावेळी बोलू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. विधानभवनात मी आणि देवेंद्र फडणवीस एकाचवेळी आलो. त्यावेळी शिष्टाचारानुसार आम्ही नमस्कार, राम..राम, हायहॅलो.. केले.
या दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. ‘याचा अर्थ असा आहे की, उद्धव ठाकरेंनी वारंवार विधानसभेत जायला हवे. म्हणजे एकत्र भेटतील, बोलतील, चर्चा करतील. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. विरोध राजकीय असतो, व्यक्तीगत नसतो. मी मागेही म्हणालो, कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणुकीत तुमचा पराभव करु. विचारांची लढाई विचारांनी करु. पण सुडाने, बदल्याच्या भावनेने कारवाई करणार असाल आणि तशी भाषा करणार असाल तर मग आम्हाला तशाच भाषेत उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्र हे एक संस्कारी राजकारण करणारे राज्य आहे’, असे संजय राऊत म्हणाले.
————————-