सोलापूर झेडपी देणार मुलांचा सहलीचा खर्च व बचतगटांना मंडपाचे साहित्य
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण भागातील मुलांना सहलीला जाण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे. याबरोबरच समाज कल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील मागासवर्गीय बचत गटांचा आर्थिक स्तर उंचावावा यासाठी केटरिंगचे साहित्य व मंडप सिस्टीमचे साहित्य देणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे २०२३-२४ चे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संदीप कोहिणकर यांनी सादर केले. या चालू वर्षांमध्ये ४५ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये समाजकल्याण, कृषी, महिला बालकल्याण आदी विभागासाठी नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने चालू वर्षी सन २०२३- २४ या वर्षांमध्ये जवळपास ४४ कोटी ९४ लाख ९७ हजार रुपयाचे अर्थसंकल्प प्रशासक संदीप कोहिणकर यांनी सादर केले. मागील वर्षी ४१ कोटी ८८ लाख ११ हजार रुपयाचे बजेट सादर करण्यात आले होते. परंतु यंदा जवळपास ३ कोटी ३ लाख ८६ हजार रुपयांचे अधिक उत्पन्नाचे वाढ या वर्षी करण्यात आले आहे.
विशेषत: कृषी विभागामध्ये कृषी यांत्रिकी करण, ट्रॅक्टर चलीत अवजारे, रोटावेटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, स्लरी फिल्टर यासाठी भरीव तरतूद करण्यात आले आहे. कृषी विभागाचे ज्या ज्या पंचायत समिती ठिकाणी गोडाऊन आहेत त्या ठिकाणी कृषी पूरक व्यवसाय करण्यासाठीचे हे गोडाऊन भाड्याने देण्यात येणार आहे. तसेच पशुपालकासाठी कडबाकुट्टी, ताडपत्री आदीचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य विभागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधी खरेदीसाठी एक कोटी श्वादंश लस, सर्पदश लस खरेदीसाठी २० लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागासाठी शेळीपालन, संगणक प्रशिक्षण, टॅली, भजनी मंडळासाठी साहित्य याबरोबरच बचत गट महिलांसाठी केटरिंग साहित्य, साऊंड सिस्टिम मंडप साहित्य करता अनुदान देण्यात येणार आहे. याबरोबर दिव्यांगासाठी देखील स्पोर्ट किट, यूपीएससी, एमपीएससी तयारीसाठी विशेष तरतूद केली आहे. समाज मंदिरामध्ये वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये वेग-वेगळे पुस्तके, फर्निचर, कपाट देण्यात येणार आहे. महिला बालकल्याणसाठी यंदा ३९ लाख रुपये इतकी अधिक वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी विशेष तरतूद केली आहे. लघु पाटबंधारे विभागासाठी यंदा ७५ लाख रुपये अधिक वाढ करण्यात आले आहे.
शिक्षण विभागासाठी मागील वर्षीपेक्षा १५ लाख रुपये जास्त वाढ करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळांना संगीत साहित्य. शाळा देखभाल दुरुस्ती, पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेत बसणार्या विद्यार्थ्यांची फी भरण्यास तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच बांधकाम विभागासाठी देखील यावर्षी ५३ लाख रुपये अधिक वाढ बजेट मध्ये केली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी बीओटी तत्त्वावर गाळे बांधकामाचे नियोजन झेडपी करणार आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, बांधकाम दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उपमुख्य लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सुनील कटकधोड, बांधकाम एक चे नरेंद्र खराडे, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, लघु पाटबंधार्याचे पंडित भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
– विभाग निहाय केलेली तरतूद –
– जीईडी ५ कोटी आठ लाख
– सामान्य प्रशासन ५७ लाख
– आरोग्य विभाग ४ कोटी ३० लाख
– शिक्षण विभाग ५ कोटी ७१ लाख
– महिला बालकल्याण विभाग ३ कोटी २१ लाख
– ग्रामीण पाणी पुरवठा २ कोटी ३० लाख
– कृषी विभाग ३ कोटी ७० लाख
– पशुसंवर्धन विभाग ३ कोटी २५ लाख
– समाज कल्याण विभाग ४ कोटी ४१ लाख
– लघु पाटबंधारे २ कोटी
– बांधकाम १० कोटी ४० लाख
– एकूण जवळपास ४४ कोटी ९४ लाख ७७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
——————-