BULDHANAVidharbha

बुलढाण्यात पुन्हा ‘अवकाळी’ फटका देणार?; शेतकर्‍यांच्या उरात भरली धडकी!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना पुरते हैराण करून सोडले. दरम्यान जिल्ह्यात १४ मार्च ते १६ मार्च रोजी अवकाळी पावसाची शक्यता कृषी हवामान केंद्राने वर्तविल्याने हवालदिल शेतकर्‍यांच्या उरात धडकी भरली आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून रात्री हिवाळा आणि दिवसा उन्हाळा असे मिश्रित वातावरण असून, माणसांच्या आरोग्यसह पिकाच्या आरोग्याबाबतदेखील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांची काळजी वाहणार्‍या हवामानतज्ज्ञांनी शेतकर्‍यांसाठी सल्ला दिला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात १४ ते १५ तारखेला अवकाळी पाऊस बरसणार आहे. किमान व कमाल तापमानात बदल होणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हरभरा परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलीत बंद ठेवावे. परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची विलंब न करता त्वरित कापणी करावी. सध्याचे कोरडे हवामान व वाढते तापमान लक्षात घेता व पुढील दिवसांमध्ये येणार्‍या अवकाळी पावसाआधी कापणीस उशीर झाल्यास घाटे तुटून पडल्याने उत्पादनात घट होऊ शकते. गहू पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत उंदीर व्यवस्थापन करण्यासाठी उंदीराचे शेतातील पर्यायी अन्न स्त्रोत नष्ट करावेत, तसेच शेतातील बिळे बंद करावीत.

भाजीपाला व फळबागांना नियमितपणे ओलीत करावे, व ओलितासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होईल व पाण्याचा अपव्यय टाळता येईल. कोंबड्यांच्या शेडमध्ये पक्षांची गर्दी टाळावी, शेडच्या आकारमानानुसार आवश्यक तेवढ्याच कोंबड्या ठेवाव्यात. तसेच मेघगर्जनेसह वारं वादळ व अवकाळी पावसामुळे जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करून ठेवावी. शेतात तयार झालेला मालावर ताडपट्टी टाकून त्याला सुरक्षित करावे, शेतात तयार असलेला पालेभाज्या फळे हेसुद्धा खराब होऊ नये म्हणून त्याची देखील ठेवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यामुळे त्याची गुणवत्ताही कायम राहील, असे जिल्हा कृषी हवामान केंद्राचे हवामानतज्ज्ञ मनेष येदूलवार यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!