सलग तिसर्या दिवशी ‘अवकाळी’चा कहर; बुलढाणा जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टरवरील गहू, हरभरा पिकांची नासाडी!
– अंदाजे साडेपाच लाखांपेक्षा जास्त शेतकर्यांना फटका!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात आज ७ मार्चरोजीही काही भागात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे काढणीस आलेल्या रब्बीचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबे गळाले असून, फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल व कृषी यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान, पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वातावरणातील गारवा मात्र वाढला आहे. जिल्ह्यात ४ ते ७ मार्चदरम्यान बरसलेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या सुमारे अडीच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांना जबर फटका दिला आहे. पावणेदोन लाख हेक्टरवरील गहू, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून, जवळपास सहा लाख शेतकरी बाधीत झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरिपानंतर आता रब्बीचेही नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद््ध्वस्त झालेला आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. काही भागात विजेच्या कड़कड़ाटासह जोरदार पाऊस झाला. आजही बुलढाणा, संग्रामपूर, सिंदखेड़राजा, चिखली, मोताळा, मेहकर, खामगाव, लोणार, देउळगाव साकरशा, मिसाळवाड़ी, जानेफळसह जिल्ह्यात इतरही भागात पाऊस झाला. चिखली तालुक्यातील काही भागात तर गारा पडल्यात. मोताळा तालुक्यातील ड़िड़ोळा बु. परिसरात वादळी वार्यासह पाऊस पड़ल्याने अनेक शेतकर्यांची उभी ज्वारी झोपली. पाऊस सुरूच असल्याने काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, मोहरी तसेच फळबागांचे नुकसान सुरूच असून, काही प्रमाणात आलेले आंबेसुद्धा गळून पडले आहेत. असाच पाऊस सुरू राहिला तर नुकसान आणखी वाढणार आहे. यावर्षी पाऊस पिच्छा सोड़ायला तयार नसल्याने शेतकरी आणखी संकटात सापड़ला आहे. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वातावरणातदेखील गारवा वाढला आहे. दरम्यान, हवामान खात्याने ९ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंचनाम्याचे निर्देश!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्य सचिव व संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून नुकसानीची माहिती घेतली व पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे ट्वीटदेखील त्यांनी केले आहे. या अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यात नाजूक पीक समजला जाणारा गहू आडवा झाला असून, चांगला भाव मिळणार्या हरभर्याची हानी झाली आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, वरवट बकाल, सोनाळा, लाडनापूर या परिसरातील संत्री जमिनीवर पडली आहे.
——————