बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लाईनमन चोवीस तास जनतेच्या सेवेत असतो. उन, वारा, पाऊस इतरही संकट झेलत लाईनमन आपल्यासाठी सदैव तत्पर असतो. त्यांच्याच खांद्यावर महावितरणचा ड़ोलारा उभा असून, लाईनमनच महावितरणचा कणा असल्याचे प्रतिपादन मेहकरचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत उईके यांनी केले.
लाईनमन दिनानिमित्त मेहकर उपविभागातील लाईनमन कर्मचार्यांचा सत्कार मेहकर येथील कार्यालयात नुकताच करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जानेफळचे सहाय्यक अभियंता निकम, सहाय्यक अभियंता नाईक, सहा. अभियंता बोळे , सहा. अभियंता किशोर राठोड, सहा. अभियंता बावस्कर यांच्यासह मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती होती. लाईनमन बांधवांचा थेट जनतेशी संबंध येतो म्हणूनच त्यांना जनमित्र म्हणतात. जनतेशी असलेली नाळ कायम ठेवत आणखी लोकाभिमुख सेवा द्यावी, असा आशावाद सहा. अभियंता नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. इतरही मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. सत्कारामुळे आमची जबाबदारी वाढली असून आणखी चांगली सेवा देवू अशी, ग्वाही लाईनमन बांधवांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बावस्कर तर आभार जाधव यांनी मानले. सुरक्षिततेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहकर कार्यालयीन कर्मचार्यानी परिश्रम घेतले. यावेळी मेहकर उपविभागातील लाईनमन कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.