व्यापारांचे निवेदन बघून जिल्हा पोलीस अधीक्षक झाले अवाक; बळीराजांसोबत बनावट ‘शेतकरीचोर’ करतात शेतमालाची विक्री!
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – बळीराजासोबत बनावट शेतकरीचोर शेतमालाची विक्री करीत असून त्याचा भूर्दंड मात्र व्यापार्यांना बसत आहे. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा प्रकार असून व्यापार्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना यांना निवेदन दिले आहे. तर निवेदन बघून जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाडदेखील अवाक झाले.
मागील काही दिवसांपासून चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी चोर – पोलीस यात चांगलेच गुरफटले आहे. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि व्यापार्यांना चांगला व्यापार करता यावा, यासाठी शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली आहे. व्यापारासाठी बाजार समितीकडून रीतसर परवाना घेऊन अडते व्यापारी आपला व्यापार करीत असतात. या बाजारपेठेमध्ये शेतकर्यांची फसवणूक होणार नसल्याची खात्री असल्यानेच बळीराजा आपला माल येथे विकायला आणत असतो. परंतु आता बळीराजा सोबतच चोरटेसुद्धा चोरलेला माल बाजार समितीमध्ये येऊन शेतकरी म्हणून विकतो. व्यापारीसुद्धा त्या मालाची हराशी करून पट्टी सोबत पैसे त्याला देतात. तो माल संबंधित व्यापारी बाहेर गावच्या मोठ्या व्यापार्यांना विकून टाकतात. इथपर्यंत व्यापार्यांना वाटते की घेतलेला माल हा शेतकर्याचाच आहे. परंतु अचानक कालांतराने पोलीस त्या चोरास पकडतात आणि त्याला घेऊन संबंधित व्यापार्याकडे धडकतात. आणि तुम्ही चोरीचा माल घेतला असून तुम्हीसुद्धा गुन्हेगार आहात, अशी समज देतात. व्यापार्याकडून त्याच्याकडे असलेले त्याने स्वतः विकत घेतलेला दुसरा माल चोरीच्या माल म्हणून ते आपल्या ताब्यात घेतात. परंतु यावेळी व्यापार्यांची इथे चांगलीच फजिती होऊन बसते. कारण, बाजार समितीमध्ये येऊन माल विकणारा हा कास्तकारच असतो ही एक समज आहे. चोरटेसुद्धा माल आणून विकतात. परंतु त्यांना रीतसर पावती आणि पैसे परतावा म्हणून दिल्याही जाते. आणि पोलीस येऊन माल ताब्यात घेतात. यावेळी व्यापार्यांनी दिलेले पावती आणि पैसे मात्र व्यापार्यांना कधीच परत मिळालेले नाही. म्हणजेच व्यापारी आपल्या जवळील माल ही देतो आणि पैसेसुद्धा. म्हणजेच चोर सोडून संन्यासाला फासी अशीच काही व्यथा या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
व्यापार्यांच्या या निवेदनामुळे स्वतः पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड हेसुद्धा अवाक झाले आहे. त्यांनी व्यापार्यांनी केलेली मागणी योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा माल ही जातो आणि पैसे ही जातात हे चुकीचे आहे. कोणताही शेतकरी जेव्हा बाजार समितीमध्ये माल विकण्यास आणतो तेव्हा बाजार समितीच्या गेटवरच त्याची चौकशी केल्या जाते आणि मगच त्याला बाजार समितीच्या आवारात आत सोडले जाते. त्या गेटमधून आलेला व्यक्ती हा कास्तकारच आहे ही समज सर्व व्यापार्यांची होते आणि व्यापार केला जातो. यापुढे अशी काही घटना पुन्हा समोर आली की, अडते व्यापारी यांच्याकडे पोलीस न जाता ते बाजार समितीकडे चौकशी करतील असे त्यांनी सांगितले. आम्ही व्यापारी हे कृ. ऊ. बाजार समितीचे अधिकृत परवाना धारक असून नियमानुसारच काम करीत असतो. बाजारात येणारे प्रत्येक व्यक्ती ही शेतकरीच येतात. शेतकरी कोण व चोर कोण हे आम्ही ओळखू शकत नाही. मात्र मागील काही प्रकरणात व्यापार्यांना नाहक त्रास होऊन आर्थिक नुकसानही झाले, हे कुठंतरी थांबल पाहिजे. असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.