सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यामध्ये शेतकर्यांचे एवढे सगळे प्रश्न असताना शेतकर्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला अगदी विरोधी पक्षालासुद्धा वेळ नाही आणि सत्ताधारी तर ते त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत. यासह विविध विषय घेऊन उद्या (दि.२२) आम्ही राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टी हे सोलापुरात सात रस्ता येथील विश्रामगृह येथे आले असता, त्यांनी या चक्काजाम आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
राजू शेट्टी म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजेची घरगुती आणि शेतीच्या दरवाढीसाठी महाराष्ट्रामध्ये विजेचे सर्वाधिक दर आहे. त्याच्यामध्ये पुन्हा ३७ टक्के दरवाढ असे आम्हाला मान्य नाही. दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये फक्त पाच जिल्ह्यांमध्ये सरकारने दिवसा वीज दिलेली आहे. संपूर्ण राज्यांमध्ये शेतकर्यांना दिवसा वीज दिली पाहिजे. कारण जंगली जनावरांच्या हल्ल्यामध्ये सर्पदंशांमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होत आहे. शेतकर्याला रात्री वीज दिल्यामुळे जमिनीचा आणि शेतकर्यांमध्ये संघर्ष होत आहे. त्यामुळे शेतकर्याला दिवसा वीज मिळावे. तसेच पावसाळ्यामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी मदत न देता सरकारने शेतकर्याला वार्यावर सोडले आणि आता थोडसं विहिरीला पाणी आहे बोरला पाणी आहे भर उन्हाळ्याच्या तोंडावर थकबाकीच्या वसुलीसाठी शेतकर्यांची वीज तोडायचं काम चालू झालेले आहे. त्यामुळे ही वीज तोडणी त्वरित थांबवावी. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेले आहे त्याचे नुकसानभरपाईचे पैसे अजून शेतकर्यांना देण्यात आले नसल्यामुळे शेतकर्यांना त्रास होत आहेत. शिवाय, सुरत-चेन्नई हा जो महत्वांशी राष्ट्रीय महामार्ग होणार आहे त्या जमिनीचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. शेतकर्यांना जसे समृद्धी महामार्गाचा मोबदला दिला गेला त्याच धर्तीवर त्याच पद्धतीने जोपर्यंत शेतकर्याला मोबदला दिला जाणार नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. या सगळ्या प्रश्नावर हा उद्याचा २२ फेब्रुवारीचा चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
एकरकमी एफआरपी कधी मिळणार?
एकरकमी एफआरपी शेतकर्यांना दिला जाईल, असे आम्ही आदेश काढतो असे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्यांचे माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या घोषणानंतर अजून सरकारने तशा प्रकारचा आदेश काढलेला नाही, असे सांगून हे सरकार साखर कारखान्यांना उसाचा एकरकमी एफआरपी कधी देणार असा सवाल, राजू शेट्टी यांनी केला.
——————