पोलिसांच्याआडून आंदोलन चिरडण्याचा सत्ताधार्यांचा डाव, पण भीक घालणार नाही!
– शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी ठणकावले!
– शेतकर्यांसाठी लढाई सुरूच राहील, पुढील महिन्यात सिंदखेडराजातून शेतकरी संवाद यात्रा काढणार
– शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी राजू शेट्टी यांचे उद्या राज्यभर आंदोलन
बुलढाणा (बाळू वानखेडे) – कापूस व सोयाबीनला भाव, पीकविम्याचे पैसे त्वरित द्यावे यासह इतर शेतकरीहिताच्या व रास्त मागण्यांसाठी आपण शेतकर्यांसह ११ फेब्रुवारीरोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत आंदोलन केले. यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यात पीकविम्याचे पैसे आले. हे आंदोलन काही सत्ताधार्यांनी पोलिसांच्या आड़ून हाणून पाड़ण्याचा ड़ाव खेळला, पण आपण याला भीक न घालता नव्या जोमाने शेतकर्यांसाठी लढतच राहू, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला व जिल्ह्यातील झारीतील शुक्राचार्य ठरलेल्या नेत्याला ठणकावून सांगितले. आज बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी रविकांत तुपकर म्हणाले, की शेतकर्यांवर सत्ताधार्यांकड़ून पोलीसामार्फत झालेल्या लाठीमाराची माहिती आपण पुढील महिन्यात सिंदखेडराजा येथूव सुरू करत असलेल्या शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन देणार असून, आंदोलन चिरड़ण्यामागे कोणते सत्ताधारी होते हे उघड़ करणार आहोत. शेतकर्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी व दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उद्या, २२ फेब्रुवारीरोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात आंदोलन आयोजित केले आहे. कापूस, सोयाबीन वायदेबंदी उठवा, सुत, सरकी ढेप, कापूस निर्यातीस प्रोत्साहन द्या, यासह इतर शेतकरीहिताच्या आपल्या मागण्या आहेत. परंतु, केंद्र सरकार कॉटन लॉबीच्या दबावाखाली आहे. ८० टक्के कापूस व ७० टक्के सोयाबीन भाव नसल्याने शेतकर्यांच्या घरात पड़ून आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्रातील मोदी सरकारकडे शिष्टमंडळ पाठवून चर्चा करावी व शेतकरीहिताचा निर्णय घ्यावा. मागीलवेळेस मुंबईत केलेल्या समुद्रातील जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने १७४ कोटी अतिवृष्टीचे मंजूर झाले तसेच १०४ कोटी विम्याचे मंजूर झाले होते. पण वाटप करण्यास टाळाटाळ होत होती. ११ फेब्रुवारीरोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होताच पीकविम्याचे आतापर्यंत १५६ कोटी वाटप झाले. पण अजूनही पीकविम्याचे पैसे बाकी आहेत. तसे अतिवृष्टीची मदत अद्याप शेतकर्यांना दिली गेली नाही, ती त्वरित द्यावी, अशी मागणी करून शेतकर्यांसाठी लढतच राहणार, असे तुपकर यांनी ठणकावून सांगितले.
जिल्ह्यधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन करत असताना आपणाला दवाखान्यात नेण्याऐवजी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले. हे पूर्वनियोजित असून काही सत्ताधार्यांच्या इशार्यावर हे सर्व घड़ले . मला संपवण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून सुपारी देण्यात आली होती, असा गंभीर व खळबळजनक आरोपही रविकांत तुपकर यांनी केला. ‘मरता वो क्या नही करता’ असे म्हणत आंदोलन तीव्र करणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. आपण बुलढाणा जिल्ह्याची खासदारकीची निवडणूक लढणार का, याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की आपण कोणतेही आंदोलन निवड़णूक ड़ोळयासमोर ठेवून करत नाही. शेतकरीहिताला प्रथम प्राधान्य देत असून, निवड़णूक लढविण्याबात शेतकरीच निर्णय घेतील, असे सांगून त्यांनी हा प्रश्न टाळला. आंदोलन काळात केलेल्या सहकार्याबद्दल रविकांत तुपकर यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेला अॅड. शर्वरी तुपकर, अमोल राऊत, दत्तात्रेय जेऊघाले, विजय बोराड़े आदि उपस्थित होते.