आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या वार्षिकोत्सवा निमित्त शासनाचे नियमांचे पालन करीत आळंदीत मंगळवारी ( दि. २१ ) भव्य बैलगाडा शर्यती होत असल्याची माहिती श्री भैरवनाथ महाराज उत्सव कमिटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी आळंदी ग्रामस्थांचे वतीने दिली. श्रींचे उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत असून सोमवारी ( दि. २० ) संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात धार्मिक परंपरांचे पालन करीत झाली. रात्री उशिरा संदल मिरवणूक झाली. यात शहरातील सर्व ग्रामदेवतांची पूजा करण्यात आली. उत्सवात बैलगाडा शर्यती, काळभैरवनाथ यज्ञ सोहळा, अभिषेख, हारतुरे, मांडव डहाळे, गावकरी भजन, श्रींचा छबिना पालखी मिरवणूक, कोरोना काळात केल्या कार्याचा गौरव तसेच विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी दिली.
आळंदी बैलगाडा शर्यतीत शासनाने केलेल्या सूचना व निर्बंध यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आळंदीतील नागरिक, बैलगाडा मालक, शॉकींन यांनी उत्सवात सहभागी होऊन उत्सव कमेटी ला सहकार्य करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी केले आहे.
आळंदीत भैरवनाथ महाराज उत्सवात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून मोठ्या प्रमाणात रोख व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नामांकित बैलगाडा मालक, शेतकरी बांधव, हितचिंतक व नातेवाईक पाहुण्यांनी उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाशशेठ घुंडरे पाटील यांनी केले आहे. बैलगाडा शर्यतीचे टोकन भैरवनाथ महाराज मंदिरात काढण्यात आले असून २०० गाडे पर्यंत टोकन देण्यात आले असल्याचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली घुंडरे पाटील यांनी सांगितले. आळंदी उत्सव निमित्त आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी मार्गदर्शन केले.
उत्सव निमित्त श्री भैरवनाथ महाराजांचे मंदिर, हजेरी मारुती मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंडप रोषणाईने मंदिर परिसराला वैभव प्राप्त झाले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईसह कमानी घालण्यात आल्या आहेत. पारितोषिकांत रोख रक्कम, जुंपता गाडा, दुचाकी, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, कुलर, टेबल फॅन, भव्य चषक अशा विविध वैयक्तिय बक्षिसांचे वाटप होणार आहे. याशिवाय चांदीची ढाल, गदा देण्यात येणार आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगत होईल.