Breaking News! आमचा धनुष्यबाण चोरला, बुलढाणा पोलिसांत तक्रार दाखल!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – शिवसेना व शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे सर्व शिवसैनिकांची अस्मिता आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन शिवसेनेचे पावित्र्य जपले आहे. भाजपाच्या मिंदे गटाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना चोरली आहे. त्यामुळे शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह परत देण्यात यावे, अशी मागणी करीत ठाकरे गटांच्या शिवसैनिकांनी जिल्हा कचेरी समोर निदर्शने केली. दरम्यान, पोलीस ठाण्यात पहिली तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली. आता या निर्णयामुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. दरम्यान, आज चोरलेले जे शिवधनुष्य रावणाने नाही पेलले, ते मिंध्यांना कसे पेलणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय असून, त्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती न करता त्यांची निवड झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. याचे सर्वत्र पडसाद असून, बुलढाण्यात धनुष्यबाणाची पहिली चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ठाकरे गटातील लखन गाडेकर, गणेश सोनुने, अमोल बुधवत, अनिल रिंढे, अशोक इंगळे, दीपक पिंपळे, सदाशिव बुधवत, हेमंत खेडकर आदींनी जिल्हा कचेरी समोर निदर्शने करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.