अभिनेते तथा खासदार अमोल कोल्हे यांच्याहस्ते शिवजयंतीचे थाटात उद्घाटन
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांनी आईसाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयुष्य पणाला लावले. तसेच आजच्या तरुणांनी देखील आपले आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घेणे म्हणजेच शिवविचार आचरणात आणणे आहे. हातात कडे, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात राजमुद्रा घालण्याची फॅशन आली आहे. पण ती ‘पॅशन’झाली पाहिजे. माती म्हणजे मातृभूमी आणि माता म्हणजे आई यांच्याशी इमान राखणे हा खरा शिव विचार आहे, त्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अभिनेते तथा खासदार अमोल कोल्हे यांचेहस्ते या उत्सव सोहळ्याचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी पार पडले. यानंतर शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवरत्न शेटे यांनी शिवचरित्रावर मौलिक मांडणी केली. ओघवत्या भाषेत डॉ. शेटे यांनी शिवचरित्राचे अनेक पैलू उलगडून दाखवले. ते म्हणाले, संस्कार काय असतात बघा, स्वराज्याची बीज शहाजीराजांनी पेरली, जिजाऊ आणि शिवबांना पुण्यात पाठवले तिथेच शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. शहाजीराजे जेव्हा पुण्यात आले तेव्हा दस्तूरखुद्द शिवाजी राजांनी बापाची पालखी खांद्यावर घेतली. बापाचा जोडा हातात घेऊन शिवराय पायी चालले. शिवचरित्राचा हा आदर्श पैलू आपण का घेऊ नये? जिजाऊंच्या स्वप्नातलं स्वराज्य उभे करून महाराजांनी हाती राजदंड घेतला. मातापित्यांच्या स्वप्नांसाठी सुखाची झोप त्यागणारा पुत्र म्हणजे शिवराय. दगडांची भिंत केली तर माणूस तुटतो पण त्याच दगडांचा पूल केला तर माणूस जोडला जातो. जोडणारा विचार म्हणजेच शिवविचार अशी मांडणी करून माणसं जोडत चला, माणसे जोडणे हे तत्व महाराजांनी पाळले हा शिव विचार आहे असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी जंजिरा किल्ला जिंकताना कोळ्याच्या मुलांनी केलेल्या कौतुकास्पद कार्याची माहिती दिली. जातीपाती पलीकडचे अष्टप्रधान मंडळ राष्ट्रभावना जागृत करते असे ते म्हणाले. किमान लोकशाही मूल्यांशी इमान राखले तरी शिव विचारांचे आचरण करण्यासारखेच आहे, अशी मांडणी त्यांनी केली. ओघवती भाषा, खणखणीत पहाडी आवाज आणि शब्दाशब्दात इतिहासाचे सखोल ज्ञान, यामुळे शेटे यांचे व्याख्यान वैचारिक मेजवानी ठरले.
प्रास्ताविक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले यांनी करून कार्यक्रमाची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचलन रणजीत सिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमास माजी पालकमंत्री ज्येष्ठ नेते डॉ.राजेंद्र शिंगणे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, आ. संजय गायकवाड, आ. धीरज लिंगाडे, रविकांत तुपकर, सुरेश देवकर, सुनील शेळके, इंदूर इथून आलेल्या अॅड. स्वाती काशीद, जिल्हाधिकारी तुंमोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड, जिल्हा परिषदेच्या सीईओ भाग्यश्री विसपुते, सैलानी ट्रस्टचे समद साहब, वसंतराव चिंचोले यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.
शिवजयंती दिशा दर्शविणारा दिन – खा. कोल्हे
शिवचरित्र पूजनाचा नव्हे तर आचरणात आणण्याचा विषय आहे. शिवजयंती हा तरुणाईला दिशा दाखवणारा दिवस आहे. महाराज आयुष्यभर निर्व्यसनी जगले. राजे असूनही सामान्य जीवन जगले. जिजाऊ मॉसाहेबांनी दिलेली उच्चनैतिक मूल्यांचे संस्काराचे अधिष्ठान लाभल्याने महाराज जगातील आगळे वेगळे राजे ठरले, असे सांगून खासदार अमोल कोल्हे यांनी शिवजयंती सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेतील मावळ्यांनी तुतारीचा एकच निनाद केला.