माजी आमदार चैनसुख संचेतींवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून अविनाश मनतकार यांची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या
– रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळकेंनी ३८ लाख घेतल्याचेही सुसाईड नोटमध्ये नमूद!
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारप्रकरणाला आज धक्कादायक वळण लागले आहे. मलकापूर येथील भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी या प्रकरणात नाहक गोवल्याचा आरोप करत, अकोला जिल्ह्यातील संस्थाचालक अविनाश मनतकार यांनी नागपूरमधील अजनी भागात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अविनाश मनतकार यांनी चैनसुख संचेती यांच्यासह अकोल्यातील रामदासपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मनतकार हे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या आणि अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नयना मनतकार यांचे पती आहेत. तेल्हारा तालुक्यातील मनात्री हे त्यांचे मूळ गाव आहे. या घटनेने अकोला व बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.
रेल्वेखाली आत्महत्या करण्यापूर्वी मनतकार यांनी एकपानी सुसाईड नोट लिहिली होती. यात भाजपचे मलकापूर येथील माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे. यासोबतच या प्रकरणाचा तपास करणारे अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्याकडून ३८ लाख उकळूनही आपल्याला मदत केली नाही, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मलकापूर अर्बन भ्रष्टाचार प्रकरणातील सर्व संचालक मंडळाची चौकशी करण्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलेले आहे. ही सुसाईड नोट त्यांनी अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांना उद्देशून लिहिलेली आहे.
या चिठ्ठीत पुढीलप्रमाणे मजकूर आहे – मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी बँकेत स्वतःचा भ्रष्टाचार लपविपण्यासाठी आम्हा पती पत्नी दोघांना फसवले, व राजकीय दबाव आणून, सर्व यंत्रणा वापरून स्वतःच्या भष्ट्राचाराचा आरोप आमच्यावर लावला. तरीही पोलिस यंत्रणेने बँक संचालकाची काहीही चौकशी केली नाही. या प्रकरणामध्ये संचालक मंडळ किती दोषी आहे, याची सखोल चौकशी करावी, चैनसुख संचेती व लखानी यांनी खोटे आरोप लावून दिलेल्या त्रासामुळे ‘मी’ माझे जीवन संपवून आत्महत्या करीत आहे. आणि याचा तपास करत असताना रामदास पेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी माझ्याकडून ३८ लाख रूपये घेतले पण काहीही मदत केली नाही. असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.
तेल्हारा शहरातील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक अविनाश मनतकार हे काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी आरोप झाल्याने ते व्यथित झाले होते. या पार्श्वभूमीवर मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात गेले. अविनाश मनतकार यांनी त्यांच्या पत्नीजवळ शेगावला जायचे असल्याचे सांगून, त्यांनी नागपुरातील अजनी रेल्वेस्थानक गाठले. गुरुवारी सायंकाळी त्यांनी राजधानी एक्सप्रेसपुढे झोकून देत आत्महत्या केली. त्यांचा मोबाइलही त्यांच्याजवळ नव्हता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नयना मनतकार यांनी आपल्या नातेवाईकांना पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू असताना मनतकार यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाले. या घटनेने अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.
——————