ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरतीसाठी पात्रताधारक करणार उपोषण
मुंबई (प्रतिनिधी) – अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती प्रक्रिया यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ संघटनेच्यावतीने २१ फेब्रुवारी २०२३ पासून पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री, संचालक यांना देण्यात आला आहे.
३ नोव्हेंबर २०१८ रोजी युती सरकारने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील विविध पदांच्या भरतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. मात्र कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या पदभरतीवर निर्बंध लादण्यात आले. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्य शासनाने पदभरतीचा शासन निर्णय काढत ३ नोव्हेंबर २०१८ शासन निर्णयातील उर्वरित २०८८ प्राध्यापकांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवला. मात्र ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील ग्रंथपालांची १६३ व शारीरिक शिक्षण संचालकांची १३९ पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरती संदर्भात जून २०२२ मध्ये तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत व तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. यात ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. मात्र या दोन पदांच्या भरतीचा शासन निर्णय निघण्या अगोदरच सत्ता परिवर्तन झाले व पुन्हा या दोन पदांच्या भरतीचा निर्णय रखडला आहे. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मंत्रालयात पदभरती संदर्भात बैठक ही झाली व यात ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांना मंजुरी दिलेचे घोषित ही केले. मात्र अद्याप पदभरतीचा शासन निर्णय निर्गमित झाला नसल्याने या पदांची भरती प्रक्रिया खोळंबली आहे.
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांनी अधिवेशनात सांगितले की, अधिवेशन संपल्यानंतर जानेवारी महिन्यातच वित्त विभागाकडे पाठपुरावा करून ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांच्या पदभरतीचा शासन काढणे हेच आमचे पहिले काम असेल. मात्र जानेवारी महिना संपला तरी अद्याप शासन निर्णय निघाला नसल्याने पात्रता धारकांमध्ये सरकार विषयी रोष निर्माण होत आहे व राज्यातील शेकडो पात्रताधारक पुणे येथील पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर २१ फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत आमरण उपोषण करत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
३०० जागा रिक्त –
राज्यातील अनुदानित वरीष्ठ महाविद्यालयात जवळपास ३०० ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची पदे रिक्त आहेत. शासनाला ३०० पदे भरण्यासाठी काय अडचण येत आहे. भरती प्रक्रिया बंद असल्याने महाविद्यालयाचा दर्जा खालावत आहे तसेच पात्रताधारकांना अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगावे लागत आहे.
ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक ही दोन्ही पदे प्राध्यापक संवर्गातील असल्याचे वेळोवेळी पत्राद्वारे शासनानेच स्पष्ट केलेले आहे. तरीही या दोन्ही पदांना भरतीसाठी मंजुरी दिली जात नाही. शासनाने पात्रताधारकांचा अंत पाहू नये. तातडीने शासन निर्णय काढावा अन्यथा राज्यातील शेकडो पात्रताधारक पुणे येथे आमरण उपोषण करतील. पात्रताधारकांमध्ये प्रचंड रोष आज निर्माण झालेला आहे.
– डॉ. रवींद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ.