– तुपकरांना भेटण्यास मज्जाव – डॉ. राजेंद्र शिंगणे, राहुल बोंद्रे पोलिसांवर खवळले!
– रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरू, तब्येतही बिघडली
– ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांचा तुपकरांना फोन, आंदोलनास पाठींबा जाहीर
– रविकांत तुपकर, पत्नी अॅड. शर्वरी तुपकर हे पोलिसांच्या ताब्यात!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – कापूस आणि सोयाबीनला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे. आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याला कार्यकर्त्यांचा विरोध झाला. या कार्यकर्त्यांवर लाठीमार करत पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. दुपारी साडेतीन वाजेनंतर पोलिसांच्या धरपकडीनंतर परिस्थिती चिघळली. पोलिसांनी तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनाही अटक केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दरम्यान, तुपकरांना पोलिस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुलभाऊ बोंद्रे यांनी बुलढाणा पोलिस ठाण्यात जात तुपकर यांची भेट घेतली. सुरुवातीला या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी आत सोडण्यास नकार दिला. परंतु, या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेताच, त्यांना तुपकर यांची भेट घेता आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी तुपकर यांना फोन करून पाठिंबा जाहीर करत, तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तुपकर हे बुलढाणा पोलिस ठाण्यात असून, त्यांची तब्येत बिघडली होती. तसेच, त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने परिस्थिती चिघळली असून, संपूर्ण जिल्हाभरातील शेतकरी संतप्त झाले असून, शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे संतप्त झालेले आहेत.
सोयाबीन, कापूस व पीकविमा प्रश्नी राज्य व केंद्र सरकारने इशारा देऊनही काहीच कार्यवाही न केल्याने अखेर आज दुपारी पोलिस वेशात येत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. साध्या वेशातील पोलिसांनी तातडीने झडप घालत तुपकरांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर तुपकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. याप्रसंगी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. आमच्या मागण्या एकतर मान्य करा, किंवा आम्हाला गोळ्या घाला, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली. बुलढाण्याचे जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार यांनीही घटनास्थळी येत तुपकर यांच्याशी चर्चा केली, तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, तरीही तुपकर व कार्यकर्ते हटले नाहीत. दरम्यान, आंदोलन लांबत असल्याने जमाव चांगलाच आक्रमक झाला होता. त्यातील काही जणांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे अखेर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढले. यावेळी पोलिस व आंदोलक यांच्या झटापट झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे एकच पळापळ झाली. या लाठीमारमध्ये हे आंदोलन कव्हर करणार्या पत्रकारांवरदेखील पोलिसांनी लाठ्या चालविल्या. त्यामुळे पत्रकारदेखील संतप्त झाले होते.
पोलिसांनी रविकांत तुपकर, त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर व संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांना ताब्यात घेत बुलढाणा पोलिस ठाण्यात नेले. पोलिस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी तुपकर यांना भेटण्यास मज्जाव केला. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी पोलिसांचा तीव्र निषेध करत, पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते. तिकडे आतमध्ये रविकांत तुपकर यांची तब्येत बिघडली असून, त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत व पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी बुलढाणा पोलिस ठाण्यात धाव घेत, तुपकर यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बोंद्रे यांनाही रोखले. परंतु, त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसह पोलिस ठाण्यातच ठिय्या सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना भेटण्यास परवानगी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी पालकमंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही तुपकरांना भेटण्यासाठी धाव घेतली असता, पोलिसांनी त्यांनाही रोखले. परंतु, आ. शिंगणे हे पोलिसांवर चांगलेच खवळले. कोणत्या नियमाआधारे आम्हाला रोखत आहात, असा संतप्त सवाल करताच, पोलिस नरमले व त्यांनाही तुपकरांना भेटण्यास सोडले. दरम्यान, पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन चिघळले असून, शेतकरी, पत्रकारांवर झालेल्या लाठीमारचा या दोन्ही नेत्यांनी निषेध केला. तसेच, तुपकर यांच्या मागण्या शेतकरीहिताच्या असून, राज्य व केंद्र सरकार पोलिसांच्या बळावर तुपकरांचे आंदोलन दडपू पहात असल्याची टीका या नेत्यांनी केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुपकरांच्या पाठीशी असल्याची ग्वाहाrही या नेत्यांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तुपकर यांचे आंदोलन सुरूच असून, त्यांनी अन्नत्याग केले आहे. जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी हे बुलढाण्यात दाखल होण्यास सुरूवात झाली असून, हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय ?
बुलढाण्यातील आंदोलनात शेतक-यांवर गुन्हे दाखल करून वेठीस धरले जात आहे. pic.twitter.com/79jKhnQbDs
— Raju Shetti (@rajushetti) February 11, 2023
—————–