बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करणार्यावर कठोर कारवाई करून त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा बुलढाणाच्यावतीने चिखली पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे हे आपल्या दुचाकीने जात असताना मागून येणार्या महिंद्रा गाडीने त्यांच्या दुचाकीला दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ज्या गाडीच्या चालकाने धडक दिली त्याच्या विरोधात वारीशे यांनी बातमी प्रकाशित केली होती. त्यामुळे यांच्या गाडीला जाणून-बुजून धडक मारून त्यांचा एक प्रकारे खून केला आहे.
अशा घटनांमुळे पत्रकारांची लेखनी कुठेतरी दाबण्याचा प्रकार होत आहे. तेव्हा दोषीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, जिल्हा सचिव संजय निकाळजे, मयूर मोरे, आम्रपाल वाघमारे यांच्यासह पदाधिकारी सदस्यांनी चिखली पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनासुद्धा देण्यात आली आहे.