सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यातील ६०० तलाठ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, बुधवारी एकाही तलाठ्याने कोणतेच काम केले नाही. त्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, तलाठी यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यांना कामकाज करण्यासाठी लॅपटॉप बरोबर प्रिंटर द्यावे, रजा द्यावी यासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये पूर्वीचे ४७० आणि नव्याने भरलेले ३०० तलाठ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ११ तालुक्यात कोणतेही कामकाज झाले नाही. तलाठी नसल्यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले होते. नागरिक आपल्या कामासाठी हेलपाटे मारत आहेत, मात्र काम बंद आंदोलन केल्यामुळे नागरिकांना कामे न करताच घरी परतावे लागले आहे. दरम्यान, तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा निघणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. जर या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही तर महसूल विभागाचे कामकाज ठप्प होणार आहेत. जोपर्यंत तलाठ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचे तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर यांनी सांगितले आहे.
महसूल प्रशासन २० लाखांचे प्रिंटर खरेदी करणार
सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यांसाठी लागणारे प्रिंटर सेतु समितीच्या निधीतून जवळपास वीस लाखांचे प्रिंटर खरेदी करण्यात येणार असून, खरेदी करून लवकरच त्याचे वाटप करण्यात येईल, असेही निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले.