मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – बुलढाणा जिल्ह्यातील खादाड अधिकार्यांचा लाच घेण्याचा मोह सुटता सुटेना. काही महिन्यांपासून जिल्ह्यात लाचखोरी करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसतेय. काही दिवसांआधी जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोर उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे लाच घेतांना रंगेहाथ पकडला होता. देऊळगाव राजा तहसीलचा अव्वल कारकून एसीबीच्या गळाला लागला होता. त्यानंतर दिनांक ८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा एसीबीने केलेल्या कारवाईने जिल्ह्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली. चिखली तालुक्यातील रायपूरमध्ये तलाठी असलेल्या प्रकाश म्हातारजी उबरहंडे वय ५६, रा. विष्णुवाडी, बुलडाणा याला एका शेतकर्याकडून ४०० रुपये लाच घेतांना बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
रायपूरच्या ग्रामपंचायत आवारात ही कारवाई करण्यात आली. पांग्री येथील एका ४३ वर्षीय शेतकर्याने या प्रकरणाची तक्रार केली होती. तक्रारदार शेतकर्याचे वडील मार्च २०२२ मध्ये मयत झाले होते. शेतकर्याच्या वडिलांच्या नावे रायपूर शिवारात असलेल्या शेतीच्या ७/१२ वर वारसाहक्काने शेतकर्याची व इतरांची नोंद करायची होती. या कामासाठी लोकसेवक तलाठी उबरहंडे याने शेतकर्याला ४०० रुपयांची लाच मागितली होती. शेतकर्याला लाच द्यायची नसल्याने शेतकर्याने एसीबीकडे तक्रार दिली होती. दरम्यान, ३० जानेवारीला २०२३ रोजी एसीबीने केलेल्या पडताळणी कारवाईत उबरहंडे याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी रायपूर ग्रामपंचायत आवारात लोकसेवक तलाठी प्रकाश उबरहंडे याला ४०० रुपये द्यायचे ठरले होते. त्यानुसार आधीच ठरलेल्या योजनेनुसार एसीबीच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी सापळा रचला होता. तक्रारदार शेतकर्याने ४०० रुपये उबरहंडे याच्या हातावर टेकवताच एसीबीने झडप घालून लाचखोर तलाठ्याला जेरबंद केले.
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, स्वाती वाणी यांनी ही कारवाई केली. ही कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अमरावती, अरुण सावंत पोलीस अधीक्षक, देविदास घेवारे अप्पर पोलीस अधीक्षक (अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सचिन इंगळे पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.बुलडाणा हे करत आहे. सर्व नागरिकांना आवाहन येत आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतीही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास दूरध्वनी क्रमांक – ०७२६२ – २४२५४८ व टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आव्हान लाचलुचपत प्रतिबंधक, विभाग बुलढाणा पोलीस उपअधीक्षक यांनी केले आहे.