Head linesMaharashtraVidharbha

सरळ सेवा भरतीमधील चालक, वाहक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या, संयमाचा कडेलोट!

– पात्र उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांसह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभाग बुलडाणा यांना निवेदन व इशारा

बुलढाणा (विनोद भोकरे) – चालक तथा वाहक सरळ सेवा भरती २०१९ मधील पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्याने या उमेदवारांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे. या पात्र उमेदवारांना तत्काळ प्रशिक्षण देवून नियुक्ती देण्यात यावी, अन्यथा २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्यात येईल, अशी मागणीवजा इशारा पात्र उमेदवारांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्यासह जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा, विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ विभाग बुलढाणा यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, कार्यालयाने २०१९ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चालक तथा वाहक पदाकरिता जाहिरात क्र. १/२०१९ नुसार ४७२ चालक तथा वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्या संदर्भात प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागवून कार्यपद्धतीने सर्व निवडीचे निकष लावून बुलढाणा विभागाची चालक तथा वाहक अंतिम निवड यादी जाहीर केली. पात्र उमेदवारांपैकी १३८ उमेदवाराचे सेवा पूर्व प्रशिक्षणही पूर्ण करून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र उर्वरित उमेदवारांना अजूनही नियुक्ती देण्यात आले नाही. त्यामुळे या उमेदवारांनी आझाद मैदान येथे उपोषण केले होते. तेव्हा आश्वासन देवून नियुक्ती देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार उर्वरित पात्र उमदेवारांपैकी ६० उमेदवारांची पुन्हा वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली, तर वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्यानंतर ६० उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणार होते. मात्र उमेदवारांची दोनवेळा वैद्यकीय चाचणी होवूनसुध्दा अद्यापही प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आले नाही. गेल्या २०१९ पासून पात्र उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्याने पात्र उमेदवार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेवून तत्काळ जिल्ह्यातील रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

जर लवकरात लवकर पात्र उमेदवारांचे प्रशिक्षण घेवून तत्काळ नियुक्ती न दिल्यास २० फेब्रुवारीपासून सर्व उमेदवार आमरण उपोषण करण्याच्या इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री, व्यवस्थापकीय संचालक, मध्यवर्तीय कार्यलय, रा. प. मुंबई, उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्र.०३ रा.प.नागपूर, महाव्यवस्थापक नियंत्रण समिती, रा.प.अमरावती, आमदार विधानसभा बुलडाणा, जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, बुलडाणा यांना देण्यात आलेल्या आहेत. निवेदन देतेवेळी मुन्ना बेंडवाल, मधुकर शिंगारे, योगेश भोकरे, सचिन गवई, नीलेश लंबे, अक्षय पाचपोर, सुशील नगारे यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!