शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत; बुलढाणा, मुंबई पोलिसांचे टेन्शन वाढले!
– आत्मदहन करणार; नाहीतर गोळ्या घाला…आता शहीद झालो तरी माघार नाही : तुपकर भूमिकेवर ठाम
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी शेतकर्यांसह बुलढाणा किंवा मुंबईत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या इशार्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना नोटीस बजावली आहे. दुसरीकडे, तुपकरांनी मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत, आता शहीद झालो तरी माघार घेणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, रविकांत तुपकर हे भूमिगत झाले असून, त्यामुळे बुलढाणा पोलिसांसह मुंबई पोलिसांचेदेखील चांगलेच टेन्शन वाढले आहे. मुंबई पोलिसांची गोपनीय शाखा व बुलढाणा पोलिस तुपकरांचा शोध घेत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे.
आत्मदहन आंदोलनाची घोषणा केल्यानंतर रविकांत तुपकर भूमिगत झाले आहेत. शहर पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी तुपकरांचा नोटीस बजावली आहे. सदर प्रश्न शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यापूर्वीचे आपली आंदोलने पाहता मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवलेले आहेत. या आंदोलनामुळे देखील मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरुपाचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सदरचे आंदोलन करु नये, याउपरही आंदोलन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे. तुपकरांनी मात्र आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून, कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच, असे सांगितले आहे. त्यामुळे आता आंदोलन पेटण्याची आणि परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
———————