अजितदादा मरता मरता वाचले!
– केवळ नशीब बलवत्तर म्हणून अजित पवार वाचले, पुण्यातील थरारक घटना
पुणे/बारामती (जिल्हा प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. स्वत: अजित पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या भीषण घटनेबाबतची माहिती बारामतीकरांना दिली. लिफ्टमधून जात असताना लाईट गेले आणि ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट खाली आली, असे अजित पवार म्हणाले. काल म्हणजेच १४ जानेवारीला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ही घटना घडली, असे अजित पवारांनी सांगितले. ते म्हणाले, की काल १४ तारीख होती. काल कुठं बोललो नव्हतो. तुम्ही आता घरचे आहात म्हणून बोलतो. काल मी सकाळी एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट घेऊन जात होतो. तिसर्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात होतो. सोबत डॉ. हार्डिकर होते. त्यांच ९० वर्षे वय आहे. सोबत सेक्युरिटी ऑफिसर होते. लिफ्टमध्ये बसलो. लिफ्ट वर जाईना. तिथचं बंद झाली. नंतर लाईट गेली. अंधार होता. नंतर ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून धाडदिशी खाली कोसळली. खोट सांगत नाही. आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता, असेही पवारांनी सांगून, इतका भीषण प्रसंग हसण्यावरी नेला.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौर्यावर होते. तालुक्यातील पवईमाळ येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते पार पडले. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी शनिवारी पुण्यात लिफ्टमध्ये अडकल्याचा जीवघेणा अनुभव मिश्किल शैलीत सांगितला. अजित पवार म्हणाले, की तिसर्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती, असा जीवघेणा अनुभव विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. सेक्युरिटी ऑफिसरनं दरवाजा तोडला. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. पण, बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितले नाही. मी घरी पत्नीलापण बोललो नाही. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. तुम्ही घरची माणसं आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांत महाराष्ट्रातील चार आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला. या अपघतात तिन्ही आमदार जखमी झाले आहे. तर आमदार बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने उडवून तो पळून गेला असून, आ. कडू यांची प्रकृती आता थोडीफार सुधारली आहे. या अपघातात आ. कडू यांना ठार मारण्याचा तर प्रयत्न नव्हता ना, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
—————