Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraWorld update

शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’!

पुणे (जिल्हा प्रतिनिधी) –  नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली. मात्र यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर ४० व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीद मिळाली. त्यावेळी बलदंड ताकदीच्या शिवराज राक्षेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न महेंद्रने हाणून पाडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले. शिवराजच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला. तत्पूर्वी, माती विभागातून अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने वाशीमच्या सिकंदर शेखला ६-४ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी किताबी लढतीत प्रवेश केला. लढतीच्या पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकाना आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सिकंदरला निष्क्रिय कुस्तीची ताकीद देण्यात आली. मात्र सिकंदर यावेळी गुण मिळवू शकला नाही. त्यामुळे एक गुण महेंद्रला मिळाला. त्यानंतर १० सेकंदातच सिकंदरने ताबा घेताना २ गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत सिकंदरने २-१ अशी आघाडी मिळविली.

दुसऱ्या फेरीत सिकंदरने आक्रमक चाल रचताना महेंद्रला बाहेर ढकलताना एक गुण वसूल केला. यावेळी ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्रला निष्क्रिय कुस्तीचा फटका बसला. यामुळे सिकंदराला एक गुण मिळाला. यावेळी सिकंदर ४-१ अशा आघाडीवर होता. आक्रमक कुस्ती होण्याच्या नादात महेंद्रने आपल्या ताकदीचा उपयोग बाहेरची टांग लावून सिकंदरला उचलून खाली फेकताना चार गुण कमावले. हाच या कुस्तीचा निर्णायक क्षण ठरला. शेवटी महेंद्रने सिकंदराला बाहेर ढकलताना अजून एका गुणाची कमाई करताना ही लढत ६-४ अशी जिंकताना महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीसाठी पात्र ठरला. गादी विभागाच्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ८-१ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी या किताबी लढाईसाठी पात्र ठरला. आजच्या लढतीत शिवराजने चपळता व बलदंड शरीराचा वापर करताना चार वेळा हर्षवर्धनला बाहेर ढकलताना ४ गुणांची कमाई केली. दोनवेळा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकी एकेक असे दोन गुण वसूल केले. दुसऱ्या फेरीत पिछाडीवर असलेल्या हर्षवर्धनने आक्रमक खेळाला सुरुवात करताना शिवराजचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलदंड शरीर व ताकदीच्या जोरावर शिवराजने हर्षवर्धनचा प्रयत्न उधळून लावत ताबा घेत २ गुणाची कमाई करताना गुणांची भक्कम आघाडी निर्माण केली. शेवटचे काही क्षण बाकी असताना आक्रमक झालेल्या हर्षवर्धनने आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र यात हर्षवार्धानला केवळ एक गुण यश मिळाले. अशा प्रकारे ही लढत शिवराजने ८-१ अशा गुनाधीक्याने जिंकताना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी मुख्य लढतीसाठी पात्र ठरला.


किताबी लढत खेळणाऱ्या मल्लाचा स्पर्धेतील प्रवास

माती विभाग : महेंद्र गायकवाड : सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत नांदेडच्या अनिल जाधवला ९-० असे पराभूत करताना आगेकूच केली. त्यानंतरच्या फेरीत हिंगोलीच्या दिगंबर भूतनरला चीतपट केले. तिसऱ्या फेरीत लातूरच्या शैलेश शेळकेला ५-२ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला चीतपट करताना महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत दावेदारी दाखल केली आहे. गादी विभाग : शिवराज राक्षे : नांदेडच्या शिवराज राक्षेने गादी विभागात दमदार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला १०-० असे एकतर्फी, दुसऱ्या फेरीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेला १०-० असे एकतर्फी तर तिसऱ्या फेरीत संभाजीनगरच्या (औरंगाबाद) पांडुरंग मोहारेला पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत शिवराजने पुण्याच्या हर्षद कोकाटेला पराभूत करताना गादी विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापवर १०-० अशी मात करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.


दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षे यानं
‘महाराष्ट्र केसरी’ जिंकून, माघार कायमस्वरुपी नसते हे दाखवलं
– महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार

मुंबई, दि. १४ :- ‘महाराष्ट्र केसरी’ किताब विजेता मल्ल शिवराज राक्षे आणि उपविजेता महेंद्र गायकवाड या दोघांचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकून, कुठलीही माघार कायमस्वरुपी नसते हे दाखवून दिलं आहे. शिवराजच्या जिद्द, प्रयत्नांचे कौतुक करावं तितकं थोडं आहे. महाराष्ट्राची गौरवशाली कुस्तीपरंपरा पुढे नेण्याचं काम शिवराज आणि महेंद्र या दोघांकडून भविष्यात होईल. महाराष्ट्राला कुस्तीतली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देण्यासाठी शिवराज राक्षे याचा विजय प्रेरणादायी ठरेल. राज्यातील कुस्तीपटूंच्या, कुस्ती चळवळीच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी राज्य सरकारने पार पाडावी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!