जनतेला आरोग्य योजनांची माहिती दिली तरच आपले उद्दिष्ट साध्य होईल!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – लोकांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहितीच नसते. केंद्र व राज्य शासन दरवर्षी आरोग्य विषयक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करीत असते. परंतु लोकांना योजनेची माहिती नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहत असल्याचे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार आरोग्य विभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी डॉ. पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
आरोग्य उपसंचालक पवार म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनांच्या रूपाने लोकांना एक संजीवनी मिळाली आहे. परंतु माहितीअभावी लोक लाभापासून वंचित राहत आहेत. आरोग्य संस्थांमध्ये व गावात दर्शनी भागात या योजनांची सविस्तर माहिती असलेले फलक लावा, गृहभेटींमध्ये लोकांना याची माहिती द्या. गोरगरीब व वंचितांना शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करा. लोक स्वतः योजनांचा लाभ घेण्यासाठी येतील तेंव्हाच तुमचे सर्व उद्दिष्ट सहज पुर्ण होतील. लोकांना संजिवनी देण्याचे पुण्यकर्म करण्याचे भाग्य आपणांस लाभले आहे या भावनेतून काम करा. असे भावनिक आवाहन डॉ.पवार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना केले. संस्थात्मक प्रसुती वाढविण्यासाठी गरोदर मातांचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कँपचे आयोजन करा. आरोग्य विभागाकडून देण्यात येणार्या सर्व सेवांची माहिती देवून या सर्व सेवा त्यांना मिळतील याचा विश्वास द्या तरच लोक सेवा घेण्यासाठी आपल्या संस्थेत येतील. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, व वैद्यकीय अधीक्षक यांनी १०८ रूग्णवाहिकांची नियमितपणे तपासणी करून यातील सर्व यंत्रणा कार्यान्वित राहतील याची दक्षता घ्यावी. कुटुंब कल्याण अंतर्गत सर्व सेवांची माहिती लोकांना समजावून सांगा. कुटुंब कल्याण साधनांचा वापर व याबाबत असलेल्या गैरसमजुती याबाबत लोकांचे समुपदेशन करा अशा सूचना यावेळी डॉ पवार यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरप्पा दुधभाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
————