इंदूरला साकारणार जिजाऊ मॉसाहेबांचा भव्य पुतळा, सिंदखेडराजा येथून जाणार पवित्र माती!
– सिंदखेडराजा ते इंदूर अशी ४०० किलोमीटरची पैदलयात्रा नेणार पवित्र माती!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्या मातोश्री जिजाऊ मॉसाहेबांचा भव्य पुतळा मध्यप्रदेशातील इंदूर शहरात साकारला जात आहे. मातृतीर्थ सिंदखेडची माती भाळी लावून ही पवित्र माती इंदूरला घेऊन जाण्यासाठी मध्यप्रदेशातील शेकडो शिवप्रेमी १२ जानेवारी सिंदखेडराजा नगरीत दाखल होत आहेत. सिंदखेडराजा ते इंदूर अशी चारशे किलोमीटरची पैदल यात्रा काढून देशभक्तीचे स्फुल्लिंग या यात्रेच्या माध्यमातून पेटवले जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले यांनी केले आहे.
स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणार्या माता म्हणजे जिजाऊ मॉसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांना उच्चनीतिमत्तेचे धडे व आदर्श राज्यकारभाराची प्रेरणा जिजाऊ मॉसाहेबांनी दिली. इतिहासामध्ये त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथे जिजाऊंचे जन्मस्थळ असल्याने हे ठिकाण शिवप्रेमींसाठी ऊर्जास्रोत बनले आहे. सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या पदस्पर्शाने पुनित झालेली पवित्र माती भाळी लावून जिजाऊंना अभिवादन करीत, मध्यप्रदेशातील शेकडो जिजाऊभक्त १२ जानेवारीला सिंदखेडराजाला दाखल होत आहेत. १३ जानेवारी रोजी पैदल ‘स्वराज्य स्वाभिमान यात्रेला’ सुरुवात होणार आहे. देऊळगावराजा, देऊळगाव मही, चिखली, बुलढाणा, मलकापूर, मुक्ताईनगर, बर्हाणपूर, खंडवा मार्गे यात्रा इंदूरला पोहोचणार आहे. इंदूर शहरातील जिजाऊ चौकात जिजाऊ व बाल शिवबा यांचा भव्य असा पुतळा दिनांक २९ जानेवारी रोजी बसवल्या जात आहे. दरम्यान, १५ जानेवारी रोजी यात्रेचा मुक्काम बुलढाणा येथे असून, संध्याकाळी गर्दे सुभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर शोन चिंचोले यांनी केले आहे.
इंदूर नगरीत जिजाऊ मॉसाहेब यांचा पुतळा बसवला जात आहे. यासाठी स्वराज्य स्वाभिमान यात्रा सिंदखेडराजा येथून आरंभ होत आहे. मध्यप्रदेशातील जिजाऊ भक्त यासाठी येत आहे. बुलढाणा जिल्हा मुख्यालय येथे १५ जानेवारी रोजी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आहे. यात सहभागी व्हावे.
– डॉ.शोन चिंचोले, अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती बुलढाणा.
———————-