भरधाव कारने ठोकरले, वडगाव तेजन येथील शेतकरी ठार

editor 1 Min Read
1 Min Read

लोणार (तालुका प्रतिनिधी) – शेतात जाणार्‍या दुचाकीस्वारास भरधाव कारने उडविल्याची दुर्देवी घटना शेगाव-पंढरपूर मार्गावरील वडगाव तेजन रस्त्यावर घडली. या अपघातात वडगाव तेजन येथील शेतकरी विष्णू तुकाराम सवडतकर (वय ५५) हे ठार झाले आहेत. या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. परंतु, ग्रामस्थांनी पाठलाग करून ही कार सुलतानपूर येथील पोलिस चौकीसमोर पकडली व कारचालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गणेश माताप्रसाद विश्वकर्मा असे कारचालकाचे नाव असून, तो आपल्या एमएच ३०-१८१ क्रमांकाच्या कारने लोणारला जात होता. दरम्यान, वडगाव तेजन येथील विष्णू सवडतकर हे आपल्या दुचाकीने दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात जात होते. वडगाव तेजन रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार ठोकर दिली. त्यामुळे सवडतकर हे रस्त्यावर पडले तर कार चालक पळून गेला. ग्रामस्थांनी गंभीर जखमी अवस्थेत सवडतकर यांना मेहकर येथील रुग्णालयात हलवले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तातडीने औरंगाबाद येथे हलविण्याचे सांगितले. औरंगाबादला नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेने वडगाव तेजन येथे हळहळ व्यक्त होत होती. पुढील तपास सुलतानपूर पोलिस करत आहेत.
—————–

Share This Article
Exit mobile version