– भाजप कामगार आघाडीची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे धाव!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – बांधकाम कामगारांवर होत असलेल्या अन्याय व कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत गेल्या पाच तारखेपासून भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुनम गेट येथे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. त्याला पाठिंबा म्हणून भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन करजोळे यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने याबाबत उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन दिले, व याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगितले. त्यावेळी शमा पवार यांनी लगेच सहाय्यक कामगार आयुक्त यांना फोन लावून कामगारावर झालेले अन्याय चौकशी करण्यास सांगितले.
गेले आठ दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाविषयी लवकरात लवकर निर्णय घेऊन कामगारांचे प्रश्न मिटवावे असे सांगितले. त्यावेळी लगेच सहाय्यक कामगार आयुक्ताचे कामगार नेते गणेश बोडू व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष करजोळे यांना फोन करून उद्या याविषयी बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना शिष्टमंडळात वैशाली बनसोडे, सोहेल शेख, कामगार नेते गणेश बोड्डू आदी उपस्थित होते.

