‘बाटू’च्या ‘आविष्कार’ स्पर्धेमध्ये ऑर्किड अभियांत्रिकीला चार सुवर्ण, एक रौप्य पदक!

editor 3 Min Read
3 Min Read

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या सोलापूर- पुणे आविष्कार झोनल स्पर्धेमध्ये ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने देदिप्यमान यश संपादित केले. ऑर्किडच्या विद्यार्थ्यांनी एकूण ६ विभागामधून ४ सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले. ही स्पर्धा एकूण ६ प्रवर्गामध्ये घेण्यात आली, सोलापूर व पुणे विभागातून एकूण ८३ कॉलेजमधून १५० प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते.

‘इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी’ या प्रवर्गामध्ये सौर उर्जेवरती चालणार्‍या ‘पाणी शुद्धीकरण’ प्रकल्पास सुवर्णपदक मिळाले. या प्रकल्पामध्ये आदित्य मेतन व सहकारी विद्यार्थ्यांनी डॉ. श्रीनिवास मेतन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प विकसित केला. भारतात दरवर्षी एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे होतो. ग्रामीण भागातील लोकांना सध्या वापरात असलेले जलशुद्धीकरण उपकरण हे जास्त किंमत व विजेची उपलब्धता नसल्यामुळे उपयुक्त होत नाहीत. या समस्येवरती उपाय म्हणून सौर उर्जेवर चालणारे व दिवसाला १२० लिटर पाणी शुद्धीकरण करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

‘हयूमनिटी आणि लॅग्वेजेस’ या प्रवर्गातून सांकेतिक भाषा interpreter या मोबाईल अ‍ॅप प्रकल्पास सुवर्णपदक प्राप्त झाले. रामानंद मोहारे व सहकारी विद्यार्थ्यांनी प्रा. मनिषा ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादित केले. मूकबधिर व सामान्य लोकांमध्ये संवाद साधण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरत आहे. मूकबधिर लोकांसाठी खुणांची भाषा तसेच संबंधित विविध प्रश्न देखील ह्या मोबाईल अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. अ‍ॅग्रीकल्चर व अ‍ॅनिमल हजबंडरी’ या प्रवर्गामध्ये ‘प्राता’ या शेतकन्यांसाठी बनवलेल्या मोबाईल अ‍ॅपला सुवर्णपदक प्राप्त झाले. हे अ‍ॅप आयुषा होमकर व सहकारी विद्यार्थ्यांनी डॉ. विपुल बाग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केले. हवामानातील बदलांमुळे पिकांवर व उत्पादकतेवर परिणाम होत आहे. या अ‍ॅपमुळे मातीतील घटकांचे विश्लेषण करून योग्य असे पिक सुचविले जाईल. त्याचप्रमाणे कॅमेर्‍याच्या साहाय्याने पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवून व्यवस्थित वाढीसाठी पोषक द्रव्ये सुचित केले जातील. यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

‘प्युअर सायन्स’ या प्रवर्गातून ‘विटानिर्मितीत- औद्योगिक कचर्‍याचा वापर’ या प्रकल्पास सुवर्णपदक मिळाले. साजिद तांबोळी व टिममेट्सने हा प्रकल्प डॉ. सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. सध्याच्या औद्योगिक युगामुळे औद्योगिक कचरा खूप प्रमाणात वाढत आहे. या कचर्‍याचा वापर विटा बनविण्यासाठी केल्यामुळे कचरा निर्मुलन होईल व या कचर्‍याची समस्या कमी होईल. त्याचप्रमाणे जमिनीचे उत्खनन ही कमी प्रमाणात होईल.
‘कॉमर्स व मॅनेजमेंट’ या प्रवर्गामध्ये ‘बांधकाम साहित्य व वाहतूक व्यवस्थापन’ या वेब अ‍ॅप्लीकेशन प्रकल्पासाठी रौप्यपदक मिळाले. हे वेब अ‍ॅप्लीकेशन अंकिता होटकर व टीम सदस्यांनी डॉ. प्रभावती बहिरगोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध केले. या वेब अ‍ॅप्लीकेशनद्वारे बांधकाम व वाहतूक या व्यवसायांना मॅनेजमेंट व ई. कॉमर्सच्या मदतीने ग्राहकांना चांगल्या व जलदसेवा पोहोचविण्यास मदत होईल. विद्यार्थ्याच्या या नेत्रदीपक कामगिरीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. सर्व प्रोजेक्टसना डॉ. अशोक मगर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. हे सर्व प्रकल्प सातारा येथे होणार्‍या इंटर झोनल स्पर्धेमध्ये सहभागी होतील.

Share This Article
Exit mobile version