सोलापूर (संदीप येरवडे) – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी आठ वाजता होणार्या कांद्याच्या काट्याला माथाडी कामगारांनी विरोध दर्शविला आहे. तर पहाटेपासूनच हा काटा पूर्वीप्रमाणे सुरू राहावा, अशी मागणी माथाडी कामगारांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे बराच वेळ बाजार समितीमधील लिलाव व काटा ठप्प झाल्याने गर्दी झाली होती. बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी या ठिकाणी येऊन कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगार आपल्या म्हणण्यावर ठाम दिसून आले.
शेतकर्यांचा आलेला कांदा काटा आणि लिलाव झाल्यानंतर व्यापार्यांना कांदा कमी मिळतो, कांदा चोरीला जात असल्याचा संशय आणि तक्रार व्यापार्यांनी बाजार समितीकडे केली होती. या प्रकरणात शेतकर्यांनी आपली भूमिका मांडताना बाजार समितीची ही जबाबदारी आहे. कांदा चोरीवर नियंत्रण ठेवावे, अशी भूमिका मांडली. गोंधळानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास काटा सुरू झाला तर दुपारी चार वाजता बाजार समितीचे चेअरमन विजयकुमार देशमुख यांच्या सोबत या प्रकरणात बैठक झाली. कांद्याचा काटा हा पहाटे पाच पासूनच सुरू होईल यावर हमाल कामगार ठाम आहेत.
बाजार समितीच्या जीआरने गोंधळ
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक सकाळी आठ वाजता कांद्याचा काटा करण्याचा जीआर काढला. या जीआरमुळे अनेक शेतकरी, हमाल, तोलार, व्यापारी यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे हा जीआर काढण्यापूर्वी विचारविनिमय करण्याची मागणी हमाल, तोलार वर्गातून केली जात आहे.
—————

