– इंद्रायणी नदीचा काठ वारकरी भाविकांनी फुलला
आळंदी/देहू (विशेष प्रतिनिधी) – यंदाच्या आषाढ वारीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उद्या (दि.२०) दुपारी अडिच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मंगळवारी (दि.२१) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच पालखी सोहळे निघणार असल्याने हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी गळ्यात तुळशीमाळ, कपाळी चंदनटिळा लावून वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत.
वारकरी भाविकांच्या गर्दीने इंद्रायणीचा काठ फुलला असून, अनेक सामाजिक संस्था या भाविकांना अन्नदान करत आहेत. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाकडून वारीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, राज्य सरकारकडून वारकरी भाविकांसाठी सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, राज्याच्या कानाकोपर्यातून वारकरी देहूत दाखल झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख तथा संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप. माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की सोमवारी दुपारी अडिच वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून प्रस्थान सोहळा सुरु होईल. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, प्रस्थान सोहळ्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम
पहाटे साडेचार वाजता देऊळवाड्यात काकड आरती
पहाटे पाच वाजता विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्यावतीने महापूजा
साडेपाच वाजता संत तुकाराम मंदिरात शिळा महापूजा
सहा वाजता वैकुंठस्थान येथे महापूजा
सकाळी सात वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज मंदिरात विश्वस्तांची महापूजा
सकाळी ९ ते ११ इनामदारवाड्यात पादुका पूजन
सकाळी १० ते १२ हभप. रामदार महाराज मोरे यांचे पालखी सोहळ्यात काल्याचे कीर्तन
दुपारी अडीच वाजता संत तुकारामांच्या पादुका इनामदार वाड्यातून भजनी मंडपात आणण्यात येईल व प्रस्थान सोहळ्यास सुरुवात
सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा देऊळवाड्यातून इनामदार वाड्याकडे मार्गस्थ व इनामदारवाड्यात मुक्कामी

