अमरावतीतील आयुक्तांवर शाईफेक प्रकरण
मुंबई/ अमरावती : विशेष प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक प्रकरणात उच्च न्यायालयाचे अटक वॉरंट घेऊन अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांचे पथक आणि मुंबई पोलिसांचे पथक रवी राणा यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर गेले होते. परंतु, आ. राणा हे राजस्थानातील कोटा येथे असल्याने ते त्यांना अटक न करता खाली हात परतले. परंतु, आ. राणा हे राज्यात पोहोचताच त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता रवी राणा मुंबईत येतात की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राणा हे मतदानाला न आल्यास भाजपचे एक मत कमी होणार आहे.
याबाबत आ. रवी राणा यांनी सांगितले, की अमरावतीहून पोलीस आले होते. त्यांच्यासोबत मुंबई पोलीसही होते. अमरावती आणि मुंबई पोलीस मला अटक करण्यासाठी माझ्या खार येथील फ्लॅटवर अटक वॉरंट घेऊन आले होते. पण मी घरी नसल्याने ते मला अटक करु शकले नाहीत. भाजपला मी मतदान करु नये, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दबाव आहे. त्यातून अमरावतीच्या पोलीस कमिश्नर यांनी अटक वॉरंट घेऊन पोलिसांना घरी पाठवले. याला मी कायदेशीर उत्तर देईन. मी भाजपच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत मत देईन. भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील. मी दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.
अमरावती येथे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ मार्च रोजी राजापेठ येथे युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केलेली होती. याप्रकरणी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्यावरदेखील शासकीय कामात अडथळा आणि हत्येचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवलेला आहे. मात्र अमरावती पोलिसांनी हा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केला. मागे झालेल्या एका तारखेवर आमदार रवी राणा हे गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बेलेबल वॉरंट बजावले आहे व हे वॉरंट घेऊन अमरावतीच्या पोलिसांचे पथक व मुंबई पोलिसांचे पथक हे रवी राणा यांच्या खार येथील फ्लॅटवर पोहोचले. मात्र आमदार रवी राणा हे कोटा येथे गेले असल्याने या वॉरंटची बजावणी होऊ शकली नाही व हे पथक परतीच्या मार्गावर निघाले होते.

