मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

editor 3 Min Read
3 Min Read

– मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाती!

वर्धा (प्रकाश कथले) – मुंबई ते नागपूरला जोडणार्‍या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ११ डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी केली. नागपूर ते शिर्डादरम्यानचा एकाच गाडीतून प्रवास करताना गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होते. त्यांच्या कारमध्ये रस्ते विकास महामंडऴाचे मॅनेजिंग डायरेक्टर राधेश्याम मोपलवार, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर अनिल गायकवाड हेसुद्धा मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्याच्याच गाडीत होते. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा ५५ किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले.

वर्धा जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर दोन टोल प्लाझा देण्यात आले आहेत. यापैकी विरुळ येथे टोल प्लाझा असून, येथे काही वेळ मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी थांबून टोलप्लाझा तसेच परिसराची पाहणी केली. येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी त्यांचे स्वागत केले. वर्धा जिल्ह्यात सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यातून महामार्ग जात आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या या महामार्गाची लांबी ५५ किलोमीटर आहे. महामार्गाची रुंदी १२० मीटर असून हा महामार्ग ६ पदरी आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर जिल्ह्याच्या हद्दीत ५ मोठे आणि २७ लहान, अशा ३२ पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा होण्यासाठी ९ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. येळाकेळी आणि विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागांत दोन ठिकाणी उन्नत मार्ग आहे. महामार्गाच्या कामाकरीता ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे, त्याकरीता २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग साकारला आहे. या महामार्गाचे लोकार्पण होत असल्याचा मला आनंद आहे,व् ाâारण या महामार्गाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली त्यावेळी मी याच खात्याचा मंत्री होतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, संभाजीनगर, नगर, नाशिक आणि ठाणे, अशी १० जिल्ह्यांचा समावेश असून यातून तब्बल २६ तालुके जोडण्यात येत आहे. ३९२ गावांतून हा महामार्ग जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई, हे अंतर फक्त ८ तासांत कापता येणार आहे.
——————-

Share This Article
Exit mobile version