– आ. जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन
पुणे (प्रतिनिधी) – “गांधी परिवार, काँग्रेसला त्यागाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेतून करत आहेत,” असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, दत्ता बहिरट आदी उपस्थित होते.
उल्हासदादा पवार म्हणाले, “सेवा, कर्तव्य आणि त्यागाची गांधी घराण्याची परंपरा आहे. ‘भारत जोडो’ मधून खऱ्या अर्थाने ‘मन की बात’ होत आहे. सत्याची जाण नसलेल्या, खोटेपणाचा बुरखा पांघरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनतेने डोळे तपासणी करण्याची गरज आहे. एका वेगळ्या परीपेक्ष्यातून देश जात असताना आजच्या स्थितीत निर्भय लोकांची गरज आहे.” स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “समाजातील सर्व घटकांना जोडणारे विविध कार्यक्रम शहराच्या विविध भागात होत आहेत. अशा अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनियाजीना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न करतो आहोत.” अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. वीरेंद्र किराड यांनी आभार मानले.
सप्ताहाचे आव्हाडांकडून कौतुक
गेली १८ वर्षे मोहनदादा जोशी या सप्ताहाच्या माध्यमातून गांधी परिवाराच्या त्यागाची, सेवेची आणि कर्तव्यभावनेने केलेल्या कामाची परंपरा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काँग्रेसच्या प्रेमाच्या, सद्भावनेच्या विचाराने समाजातील सर्व घटकांसाठी नाविन्यपूर्ण व उपयुक्त असे उपक्रम राबवत आहेत. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने दिलेल्या या कृतियुक्त शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी जोशी यांचे कौतुक केले.
राज ठाकरे जातीद्वेष पसरवणारे!
जाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे काम राज ठाकरे यांच्याकडून वारंवार केले जात आहे. मग ते इतिहासाचे दाखले देऊन असो की, भोंग्याचा प्रश्न उपस्थित करून. शरद पवार यांनी कधीही जाती-धर्मात द्वेष पसरवण्याचे पाप केले नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याची काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची विचारधारा आहे, असे कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

