पीकविम्यासाठी शेतकर्‍यांचा लोणार कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

editor 2 Min Read
2 Min Read

– कृषी अधिकार्‍यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोणार (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्‍यांचा हक्काचा पीकविमा मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, लोणार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकर्‍यांसह तीन तास ठिया आंदोलन करण्यात आले, व तालुका कृषी अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सर्व शेतकर्‍यांनी २०२२ चा खरीप हंगामाचा पीकविमा भरलेला असूनसुद्धा शेतकर्‍यांना त्याची मदत मिळू शकली नाही, व ज्यांना मिळाली त्यांना ती तुटपुंजी स्वरूपात मिळाली, व ज्यांनी तक्रार देऊनसुद्धा कृषी विभागाने गांभीर्याने न घेतल्यामुळे हजारो शेतकर्‍यांना पिक विमा पासून वंचित रहावे लागले. यावर्षी झालेल्या अतोनात पावसामुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले. अशावेळी नैसर्गिक आपत्ती म्हणून शेतकर्‍यांना पंतप्रधान विमा योजना ही सहाय्यभूत ठरायला पाहिजे होती. परंतु, तसे झाले नाही. लोणार तालुक्यातील शेतकर्‍यांनी स्वतः जवळची किंवा सावकारांकडून कर्ज काढलेले किंवा बँकेकडून घेतलेले पैसे भरून पीकविमा काढला होता. आता शेतकर्‍यांचे शंभर टक्के नुकसान झाले असतानासुद्धा विमा कंपनीने त्यांना विमा दिला नाही, व ज्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम आली त्यांना ती खूप कमी स्वरूपात मिळाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वामध्ये तालुका कृषी अधिकारी सरोदे यांचे कार्यालय लोणार येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या तालुका कृषी अधिकारी यांनी पिक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यासोबत चर्चा करून लेखी स्वरूपात लवकरात लवकर पंधरा दिवसांमध्ये कशाप्रकारे शेतकर्‍याच्या खात्यामध्ये विमाची रक्कम जमा होईल, अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर पंधरा दिवसांमध्ये जर विमा हा शेतकर्‍याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय फोडण्याचासुद्धा इशारा या ठिकाणी देण्यात आला. यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सहदेव लाड, राजेश नागरे, जीवन घायाळ, सय्यद मकसूद, संदीप सरकटे, गणेश लाड, अशोक बोडके, दीपक गायकवाड, दिलीप राठोड, प्रदीप गवई, दशरथ लाड, गणेश दराडे हे शेतकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version