– चिखली तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात उद्धव ठाकरे यांची रेकॉर्डब्रेक सभा, तब्बल एक लाखापेक्षा जास्त उसळला जनसमुदाय
चिखली, जि. बुलढाणा (एकनाथ माळेकर/महेंद्र हिवाळे) – शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला तेव्हाच ठरवले होते, मुंबईबाहेर पहिली सभा होईल, ती बुलढाण्यात जिथे जिजाऊंचे जन्मस्थान आहे तिथेच घेईन. ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची आहे. म्हणून आई जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. अशीच एकजुटीची ताकद दाखवून या गद्दारांना या जिजाऊंच्या मातीत कायमचे गाडा, अशी हाक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिखली येथे उसळलेल्या तुफान गर्दीला आणि निष्ठावंत शिवसैनिकांना दिली. चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ठाकरे यांची अतिविराट जाहीर सभा पार पडली. या सभेला तब्बल एक लाखापेक्षा जास्त शिवसैनिक जनसमुदायाची गर्दी उसळली होती. या सभेने विदर्भ, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात उत्साहाची लाट निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बंडखोर आमदार व खासदारांवर घणाघाती टीका करत, आपल्या शब्दबाणांनी या बंडखोरांचे जाहीर वाभाडे काढले. तसेच, ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य काय ठरवणार? अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. काही लोकं आज नवस फेडायला गेलेत, काही दिवसांपूर्वी हात दाखवायला गेले होते. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार? त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं, अशी स्थिती या गद्दारांची आहे, अशी शाब्दिक टोलेबाजी ठाकरे यांनी विराट जनसमुदयाच्या साक्षीने केली.
बुलडाण्यात मला काही जुने चेहरे दिसत नाहीत, असे म्हणत ठाकरे यांनी जिल्ह्यातील बंडखोरांना पैâलावर घेतले. कारण ते जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना वाटलं बुलडाणा म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता आहे. पण इथं जमलेले मर्द मावळ्यांचा उत्साह बघितल्यांवर असं वाटतंय की अन्याय जाळायला निघालेल्या या पेटत्या मशाली आहेत. जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. मी नव्या जोशाने उभा आहे, पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. भाजप हा आयात पक्ष झाला आहे. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार आहे? यांच्या पक्षात आयात केलेले नेते आहेत. भाजप भाकड पक्ष आहे, असे टीकास्त्र त्यांनी भाजप व बंडखोरांवर डागले. संविधान आज सुरक्षित आहे का?, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. लोकशाही वाचवण्याच्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे. काहीजण चाळीस रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी आज गुवाहाटीला गेलेल्या मुख्यमंत्र्यांसह चाळीस बंडखोर आमदारांना लगावला आहे.
गद्दारांनो, भाजपच्या तिकीटावर निवडून येणार नाही, हे जाहीरपणे सांगा!
मी शेतकर्यांना कर्जमुक्त करून दाखवले होते, असे ठामपणे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, माझं उघड आव्हान आहे; मी या ४० रेड्यांना, गद्दारांना विचारतोय, आम्ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणार नाही, हे यांनी जाहीरपणे सांगावे. जेव्हापासून हे खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मी शेतकर्यांची कर्जमुक्ती केली होती. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. ती करणार होतोच, पण तोपर्यंत या चाळीस रेड्यांनी शेण खाल्लं. या खोके सरकारने शेतकर्यांचे वीजबिल माफ केले नाही. शेतकर्यांना पीकविम्याचे पैसेदेखील दिले नाहीत. पीकविमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारादेखील उद्धव ठाकरे यांनी दिला.
४० रेडे नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले – संजय राऊत
———————

