पुणे (युनूस खतीब) : भीम अनुयायांनी लावलेल्या पाच हजार लखलखत्या दिव्यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा परिसर उजळून निघाला. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समितीच्यावतीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाच हजार दिवे प्रज्वलित करून अनोखे अभिवादन केले.
अविनाश महातेकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे लाखो लोकांचे जीवन प्रकाशमय झाले आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने दिव्यांना प्रज्वलित करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. यातून प्रेरणा घेऊन संविधानाचा प्रकाश समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण करावे.”

