– शाळेच्या आवारात गाजर गवताचे साम्राज्य, विद्यार्थ्यांसाठी मुत्रीघरदेखील नाही!
सिंदखेडराजा/चिखली (एकनाथ माळेकर) – सिंदखेडराजा पंचायत समितीअंतर्गत येणार्या वाघाळा येथे जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करून शाळा दिली आहे. परंतु, शिक्षण विभाग व मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळे या शाळेची दयनीय अवस्था झाली असून, ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवाय, लोकप्रतिनिधीचेदेखील या शाळेकडे दुर्लक्ष झालेले आहे. शाळेला गेट नसून, मुला-मुलींसाठी मुत्रीघर नाही, शाळेच्या आवारात गाजर गवताचे साम्राज्य पसरलेले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तातडीने या शाळेकडे लक्ष द्यावे, शाळेचे ऑडिट करण्यात यावे, व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
शाळेमध्ये फिल्टरची व्यवस्था शासनाने करून दिली आहे, परंतु शाळेमध्ये फिल्टरसुद्धा दिसले नाही. स्वच्छ शाळा सुंदर शाळा या शासनाच्या धोरणाप्रमाणे वाघाळा येथील शाळेचे वातावरण न दिसता, शासनाच्या धोरणाविरुद्ध दिसले. सदर शाळा ही सिंदखेडराजा पंचायत समितीअंतर्गत येत असून, शाळेच्या आवारामध्ये संपूर्ण परिसरात गांजर गवत आणि दुर्गंधी पसरलेली दिसून आली. शाळेच्या क्रीडांगणामध्येसुद्धा खूप मोठे गाजर गवत दिसत आहे. शाळेच्या स्वच्छतेकडे मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शासनाने शाळेसाठी खेळण्याचे साहित्य दिले होते तेसुद्धा शाळेच्या आवारामध्ये दिसले नाही, शासनाने जिल्हा परिषद शाळा वाघाळा यांचा वॉल कंपाऊंडसाठी लाखो रुपये खर्च केले आहे, परंतु वॉल कंपाऊंडचे कामसुद्धा व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे या शाळेच्या लेखाखर्चाची तपासणी करण्यात येऊन शाळेचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून पुढे आली आहे.
————–

