मलकापूर, सुलतानपूर येथे पेट्रोल पंपांवर दरोडे!

editor 3 Min Read
3 Min Read

– सुलतानपूर येथील पेट्रोल पंपावर दरोडेखोरांना कर्मचार्‍यांनी झोडपले, गाडी सोडून दरोडेखोर पळून गेले

लोणार (तालुका प्रतिनिधी) – साखरखेर्डा पोलिस ठाणेअंतर्गत येणार्‍या मलकापूर पांग्रा येथील श्रीयान पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालत, साडेपाच लाख रुपयांची रोकड पळविली आहे. वॅगेनार गाडीतून आलेल्या चार दरोडेखोरांनी पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने केबिनमध्ये प्रवेश केला. आतमध्ये झोपलेल्या कर्मचार्‍यांना टॉमी व पान्याने जबर मारहाण केली. तसेच, कॅश घेऊन पळून गेले. पेट्रोल पंपावर आलेली रोख दररोज बँकेत जमा करण्यात येते. मात्र लग्न असल्याने पंपाचे मालक पंकज भालेराव आणि त्यांचे भाऊ सचिन भालेराव हे लग्नासाठी बुलढाणा येथे गेले होते. त्यामुळे त्यांनी दुपारी दहा लाखाची कॅश घरी नेली होती. लग्नाला तिकडे उशीर झाल्यामुळे रात्री त्यांनी रोख रक्कम घरी घेऊन गेले नाही. ती पेट्रोल पंपावर असताना दरोडेखोरांनी डाव साधला. पंपावर असलेले सुमारे साडेपाच लाख रुपये लुटून नेले. ही घटना पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीमध्ये मात्र वैâद झाली आहे. त्यावरून दरोडेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

हा दरोडा यशस्वी झाल्यानंतर रात्री पुन्हा हेच दरोडेखोर सुलतानपूर येथील कालिका पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी गेले. परंतु, तेथे पेट्रोल पंपाचे कर्मचारी व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. त्यामुळे घाबरलेले दरोडेखोर गुन्ह्यात वापरलेली वॅगेनार तेथे सोडून पळून गेले. या झटापटीत एक कर्मचारी व एक दरोडेखोर जखमी झाला असल्याचे या कर्मचार्‍यांनी सांगितले. या घटनांची माहिती मिळताच, साखरखेर्डा, किनगाव राजा व बीबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, नाकाबंदी केली होती. परंतु, दरोडेखोरांचा सुगावा लागला नव्हता. दरम्यान, आज दिवसभर पोलिस दरोडेखोरांचा श्वान पथकाच्या सहाय्याने माग काढण्याचा प्रयत्न करत होते. काही सराईत गुन्हेगारांवर पोलिसांना संशय असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मलकापूर पांग्रा येथील पंकज भालेराव यांच्या श्रीयान पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वॅगनार गाडीतून आलेल्या चार दरोडेखोरांनी पेट्रोल भरण्याचा बहाणा करून केबिनमध्ये प्रवेश करत, आत झोपलेल्या कर्मचार्‍यांना मारहाण करून साडेपाच लाख रुपये लुटले. त्यानंतर ते सुलतानपूर येथील कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी गेले, तेथील कर्मचार्‍यांनी प्रतिकार करताच दरोडेखोर घटनास्थळीच गाडी सोडून पसार झाले, या झटापटीत एक दरोडेखोरदेखील जखमी झाल्याची माहिती पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांनी दिली आहे. साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले, की मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर रात्री दरोडा टाकणार्‍या दरोडेखांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरू असून, लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल. दरम्यान, पोलिस दरोडेखोरांचा कसून शोध घेत होते.
——

Share This Article
Exit mobile version