‘शिवशक्ती’-‘भीमशक्ती’ एकत्र येणार!

editor 5 Min Read
5 Min Read

– निवडणूक लागली की आम्ही एकत्र येऊ – प्रकाश आंबेडकर
– प्रकाश आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा धबधबा – उद्धव ठाकरे

मुंबई (प्राची कुलकर्णी) – महाराष्ट्राचे दोन नातू, एक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तर दुसरा प्रबोधनकार ठाकरे यांचा, हे दोन नातू एकाच ठिकाणी एका व्यासपीठावर आल्याचे ऐतिहासिक दृश्य आज महाराष्ट्राने पाहिले. निमित्त होते, ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पण सोहळ्याचे. मुंबईतील शिवाजी मंदिरात छोटेखानी समारंभात हा सोहळा पार पडला. देशात फोफावत चाललेल्या हुकुमशाहीविरोधात लोकांना जागे करण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. तसे आपण केले नाही तर मोठ्या लोकांचे नातू म्हणून सांगण्याचा आपल्याला अधिकार राहणार नाही, अशी साद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली. तर शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे. ताबडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ. नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्याला प्रतिसाद दिला. दोघांच्या वक्तव्यांतून शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे मात्र स्पष्ट झाले.

याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, की आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावंच लागेल. नुसतं लोकांना जागं करुन उपयोग नाही. आपण जर काही करणार नसू तर लोकं झोपली तर झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी नको करुयात. जागं करुन सोडणार असू मग ते न केलेलं बरं नाही. पण आपण ते करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही’, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. तसेच, प्रकाश आंबेडकर हे ज्ञानाचा धबधबा आहे, असे सांगून, ‘त्यांना भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा, त्याला मिनिटांचं गणित लागत नाही. आम्ही आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमचं दोघांचं एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेनी होत आहे, असे सांगून ठाकरे यांनी, आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखलं पाहिजे, त्यासाठी जे-जे लोक एकत्र येऊ शकतील त्यांनी सोबत यायला हवं. राज्य हे केंद्राचे गुलाम नाहीत, हे राज्यघटनेत आहे. राज्य आणि केंद्राचं नातं कसं हवं? वाट्टेल ते करून आम्हाला सत्ता हवी अशी मनोवृत्ती केंद्राची झाली आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

तर, प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मनुस्मृती हे असं विष आहे, जे प्राशन केल्यामुळे मनुष्याचाही नाश होतो आणि देशाचाही नाश होतो. ‘मनुस्मृती हे विष आहे असं प्रबोधनकारांनी म्हटलं होतं. देशाच्या गुलामगिरीचं कारण हे मनुस्मृतीमध्ये आहे असं त्यांनी सांगून ठेवलय. सध्या धार्मिक दडपशाहीचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. पण आपल्या राज्यातील संतांची परंपरा याला अपवाद आहे. त्यांनी सुरू केलेली वारी ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. वारीत जाणारा माणूस हा त्या दडपशाहीचा बळी ठरणार नाहा. देशात दोन परंपरा आहेत एक म्हणजे वैदिक आणि दुसरी संत परंपरा, वैदिक परंपरेत दडपशाही आहे. प्रत्येकाने ठरवावे लागेल की तुम्हाला हुकूमशाही हवी की लोकशाही, असा सवाल आंबेडकरांनी विचारला. ते म्हणाले, प्रत्येक मतदाराने हा विचार करावा की ते लोकशाहीच्या बाजूने आहोत की हुकूमशाहीच्या बाजूने हा विचार करावा. ‘महाराष्ट्रात सध्या असणारं राज्य हे सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी स्टे ऑर्डरच्या याचिकेबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावा’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ‘शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे. ताबडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ. नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ’, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत एकत्र यायचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढेल, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले. या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
—————–

Share This Article
Exit mobile version