राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आता जनयात्रा झाली!: नाना पटोले
भारत जोडो यात्रेचा अनुभव अविस्मरणीय: अशोक चव्हाण.
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) – राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेला दररोज प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ही पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नसून लोकशाही व संविधान वाचले पाहिजे अशी भावना असलेल्या प्रत्येकाची आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणानंतर महाराष्ट्रात जनतेचा या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून, भारत जोडो यात्रा आता ‘जनयात्रा’ झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी प्रदेश काँग्रेसह नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने चोख व्यवस्था करून जिल्ह्यात यात्रा यशस्वीपणे पार पाडली. याआधीही आम्ही काँग्रेस पक्षासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले पण भारत जोडो यात्रेचा अनुभव वेगळाच होता. एवढी मोठी यात्रा व त्याला मिळालेला जनतेचा पाठिंबा अपेक्षेपेक्षाही जास्त होता. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा माझ्यासह अनेकांसाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, AICC च्या माध्यम विभागाच्या महिमा सिंह, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सोशल मीडियाचे विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

