– प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची माहिती
बुलढाणा (प्रतिनिधी) – संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे. आखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेस जाहीर पाठिंबा दिला आहे.
देशातील शेतीमाल धोरण, स्वामिनाथन आयोग, महागाई, बेरोजगारी, शासकीय कंपन्यांचे खाजगीकरण, देशातील धर्माधर्मातील अस्थिरता यासह अनेक समस्यावर सद्या राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा येत्या १८, १९, २० नोव्हेंबर २०२२ रोजी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव, खामगाव, संग्रामपूर, जळगांव जामोद तालुक्यातून मध्यप्रदेशमध्ये जाणार आहे. संभाजी ब्रिगेड याच विषयावर नेहमी महाराष्ट्र राज्यात सदर मागण्या निकाली काढण्यासाठी मागण्या, आंदोलने करीत आहेत. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा हाच उद्देश असल्यामुळे संभाजी ब्रिगेडने भारत जोडी यात्रेस पाठिंबा दिला आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरव खेडेकर यांच्या नेतृत्वात तथा प्रदेश कार्याध्यक्ष बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.गजानन पारधी, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, बुलडाणा दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष विकास खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे जिजाऊ ब्रिगेड व इतर सर्व कक्षाचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अमोल दाभाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलेले आहे.
—————

