सुरेश पाटील जबरदस्त ताकदीचा लेखक : रघुपती भट्ट

editor 2 Min Read
2 Min Read

प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाटील यांची दाह, नक्षलबारी या कादंबर्‍या मराठी साहित्यातील क्रांतीपर्व आहेत. त्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक रघुपती भट्ट सर यांनी मेसेंजर या अ‍ॅपवर गौरवपूर्ण भावना व्यक्त केल्या आहेत. त्या येथे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वाचकांसाठी आवर्जुन देत आहोत. पाटील यांची ‘दाह’ व ‘नक्षलबारी’ या कादंबर्‍या वाचल्यानंतर स्व. शंकर सारडासर यांनीही अमेरिकन कन्सेप्ट   ‘promising writer’  हा शब्दप्रयोग त्यांच्यासाठी वापरला होता.

जबरदस्त ताकदीचा लेखक: सुरेश पाटील : रघुपती भट्ट
सुरेश पाटील यांना मी कधीही भेटलो नाही.पण तरीही ते माझे मित्र आहेत. त्यांचा फेसबूक ब्लॉग मी बघत असतो.माझ्याही अनेक लेखाना त्यांनी मनापासून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.कोल्हापूर हा आमच्यातला धागा असेल कदाचित.
आमच्या मैत्रीची सुरवात दाह कादंबरीनं झाली. आमच्या ग्रंथालयात मी ही कादंबरी वाचली आणि मी अवाक झालो. कादंबरी लेखन कसं असावं यावर इंग्रजीत अनेक पुस्तकं आहेत.(त्यातल्या कुणीही कादंबरी लिहीलेली नाही.) मराठीत ना.सि.फडक्यांचं ‘प्रतिभासाधन’ प्रसिध्द आहे. फडके मात्र जनमानसावर मोहिनी घालणारे प्रथितयश कादंबरीकार होते. सुरेशचं वेगळेपण म्हणजे कादंबरी लिहीण्यापूर्वीचा त्यांच्या प्रचंड अभ्यास. ते त्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्यात रंगून जातात आणि परीणामस्वरुप वाचकही त्यात गुंतून जातात. मी ब्रिटीश नॉवेल हा विषय गेली अनेक वर्षे शिकवतो आहे. पण सुरेशप्रकार त्यात कमी. आपबितीवर लिहीणारे त्यात जास्त आहेत. उदाहरणार्थ चार्ल्स डिकन्सनं आपल्या स्वताच्या आयुष्यावरच जास्त लिहीलं.ते आगळंवेगळं होतं हा भाग वेगळा. पण अलिकडचे काही लेखक सुरेशप्रकारचे आहेत. उदाहरण आयर्व्हींग वालेसचं आहे. या अमेरिकन लेखकानं अनेक कादंबर्‍या लिहील्या. द वर्ड ही कादंबरी बायबलवर आहे. द प्राईज ही कादंबरी नोबेल पारितोषिकावर आहे. नोबेल कमिटी किती घक्कादायक निकष वापरते याचा वालेसनं सखोल अभ्यास केला होता.
सुरेश त्या जातकुळीचे लेखक आहेत असं माझं मत आहेत. यापूर्वीही असे लेखक मराठीत झालेले आहेत पण त्यांचं लिखाण एखाददुसर्‍या कादंबरीपुरतं मर्यादित राहीलं आहे. अनिल बर्वेंचं उदाहरण आहे. डोंगर म्हातारा झाला,अकरा कोटी गालन पाणी, होरपळ इत्यादि अनेकासाठी बर्वेनी खूप अभ्यास केला होता. बर्वेंची कारकिर्द लवकर संपली. सुरेशचे एकेकाळचे मित्र विश्वास पाटील हेही त्या यादीत आहेत.
सुरेशचं त्यावेळी मी कौतुक मी केलं होतं.आज मी पुनरुच्चार करतो आहे. सुरेशनं खूप लिहावं असंच अभ्यासू लिहावं, रंगून लिहावं.
—————-

Share This Article
Exit mobile version