केंद्रीय यंत्रणा पाळीव कुत्र्यासारखी, उद्धव ठाकरेंचा केंद्रावर घणाघात!

editor 3 Min Read
3 Min Read

– ते संजय राऊत यांना पुन्हा कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये अडकवतील!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेकायदेशीर अटक केली जातेय. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. केंद्रीय यंत्रणा पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहेत, अशी जोरदार टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना नेते संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर, राऊत हे आज मातोश्रीवर गेले. तेथे त्यांचे रश्मीताई ठाकरे यांनी औक्षण करत स्वागत केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कालचा दणका न्यायालयाने केंद्राला दिल्यावरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, की हायकोर्टाने संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे परखड निरीक्षण बुधवारी नोंदवले होते. एवढ्या चपराकी लाज वाटण्यासारख्या आहेत. हे (भाजपचं सरकार) केंद्रात सरकार नसतं तर अशा घटना घडल्या नसत्या. कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना यावेळी सुनावले. घाबरुन पक्षातून काही लोकं पळून गेले. त्यांनाही हा मोठा धडा आहे. न्यायालये निष्पक्षपातीपणे निर्णय देत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काल पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर राऊत यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच पुन्हा एकदा राऊत यांना त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘केंद्रीय यंत्रणा सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं की त्याच्या अंगावर जात आहे. केंद्रीय यंत्रणांची ही स्थिती असताना न्यायव्यवस्थेलाही अंकित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय कायदामंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यातून याचेच संकेत मिळत आहेत. देशातील लोकांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे,’ असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. न्यायदेवतेवरही शंकेचे वातावरण निर्माण झालंय. न्याय देवताही आपपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र करतात की काय अशी केंद्रीय कायदामंत्री रिजिजू यांची वक्तव्ये आहेत. सर्व सामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असतात. न्यायालय आपल्या बुडाखाली घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे, असेही ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, संजयच्या धाडसाचे कौतुक आहे. मित्र तोच असतो जो संकटात सोबत लढतो. संजय माझा जीवलग मित्र आहे, असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.
—————

Share This Article
Exit mobile version