वर्धा (प्रकाश कथले) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्ध्यात ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी जाहीर केले.
वर्धेतील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. यावेळी घटक संस्थांकडून संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता नावे मागविण्यात आली. त्यात माजी न्यायमूर्ती चपळगावकर यांची एकमताने निवड झाली. यावेळी उपाध्यक्ष रमेश वंसकर, कार्यवाहक डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत ससाणे आदी उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३,४,५ फेब्रुवारी रोजी स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.
या संमेलनाचे उद्घाटन ३ फेब्रुवारी रोजी सकाळी होईल. ग्रंथप्रदर्शनात साधारणतः ३०० गाळे असतील. त्याचे उद्घाटन २ फेब्रुवारी रोजी पूर्वाध्यक्षांच्या हस्ते होईल. प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांच्या सोयीकरिता हा बदल करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनाची सुरूवात ३ फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडीने होईल. मुलाखत, परिसंवाद, युवा संवाद, कथाकथन, कवी संमेलने, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, वाचक अनुभव कट्टा, बाल मंच, खुला कलामंच असे अनेक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनादरम्यान वेगवेगळ्या दहा विषयांवर परिसंवाद होणार आहे. संमेलनाचा समारोप ५ फेब्रुवारी रोजी होईल.
बैठकीला अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, प्रकाश होळकर, मनोहर सप्रे, दादा गोरे, प्रा. डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. किरण सगर, प्रा. विद्या देवधर, अ. के. आकरे, प्रकाश गर्गे, प्रदीप दाते, विलास मानेकर, डॉ. गजानन नारे या महामंडळाच्या सदस्यांसह संजय इंगळे तिगावकर, डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते, महेश मोकलकर, प्राचार्य पद्माकर बावीस्कर, डॉ. स्मिता वानखेडे, आकाश दाते, विकास लिमये, उदय पाटणकर, विवेक अलोणी, प्रदीप मुन्शी, इंद्रजीत ओरके, प्रदीप मोहिते, अनिल गडेकर, प्रमोद कळमकर आदी आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर चपळगावकर यांच्या रुपाने वर्ध्याच्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विचारवंत लेखक अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तर्कशुद्ध, तत्त्वनिष्ठ भूमिका ठेऊन चपळगावकर यांनी वैचारिक लेखन केले आहे आणि मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा ते हैद्राबाद मुक्ती संग्राम यासंदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांची झालेली निवड अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आनंद होत आहे, असे अध्यक्ष उषा तांबे यावेळी म्हणाल्या.
————-

