Chikhali Breaking! अखेर भामट्या रनमोडेविरुद्ध गुन्हे दाखल!!

editor 5 Min Read
5 Min Read

– चिखली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल, साडेतीन कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचे नमूद
– चिखली व अंढेरा मिळून 281 शेतकर्‍यांनी दाखल केल्या तक्रारी
– पळून गेलेल्या रनमोडेसह त्याच्या साथीदारांचा कसून शोध सुरु

चिखली (विशेष प्रतिनिधी) : ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक करून पळून गेलेल्या संतोष बाबूराव रनमोडे यांच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात चिखली पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले असून, या फसवणुकीचा तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. चिखली पोलिस ठाण्यात आतापर्यंत १६१ व अंढेरा पोलिस ठाण्यात १२० शेतकर्‍यांनी रनमोडेसह त्याच्या साथीदारांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. चिखली पोलिस ठाण्यांत दाखल तक्रारीनुसार, फसवणुकीचा आकडा तीन कोटी ४१ लाख ४२ हजार ५०५ रुपयांपर्यंत जात आहे. शेतकर्‍यांकडून सोयाबीन, हरभरा या शेतमालाची खरेदी करून, त्यांना त्यापोटी चेक देऊन हा भामटा पळून गेलेला आहे. आता त्याचा पोलिस कसून शोध घेत आहे.
चिखली तालुक्यातील जवळपास पाचशे ते साडेपाचशे शेतकर्‍यांचा शेतमाल खेडा पद्धतीद्वारे खरेदी करून बनावट व्यापारी असलेला संतोष रनमोडे व त्याचे साथीदार शेतमालासह पळून गेले आहेत. या घटनेत १० कोटींपेक्षा जास्त रकमेची शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. परंतु, फक्त चिखली पोलिसांत दाखल तक्रारींचा आकडा साडेतीन कोटींचा आहे. तब्बल 281 शेतकर्‍यांनी तक्रारी दाखल करूनही चिखली व अंढेरा पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ चालवली होती. परंतु, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीडित शेतकर्‍यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी स्वतः जिल्हाधिकारी हे जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोलले होते. त्यानंतर आज सकाळी गुन्हे दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याची कारवाई झाली.
या शेतमाल खरेदीतील फसवणुकीमुळे चिखली तालुका हादरून गेला आहे. तालुक्यातील खैरव, अंबाशी, गांगलगाव, भालगाव, घोडप, कोलारा, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, अंचरवाडी, मेरा, अमोना, िंपपळवाडी आदी गावांतील शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करून संतोष बाबुराव रनमोडे व त्याचे साथीदार अशोक म्हस्के, नीलेश साबळे यांनी हरभरा, सोयाबीन आदी शेतमाल जादा दराचे आमिष दाखवून खरेदी केला होता. परंतु, पैसे न देता खोटे चेक देऊन हे भामटे पळून गेले आहेत. जवळपास पाचशे ते सहाशे शेतकर्‍यांची अंदाजे १० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे. परंतु, अद्याप सर्व शेतकरी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे आलेले नाहीत. रनमोडेचे पंटर तालुक्यात अद्यापही कार्यरत असून, ते शेतकर्‍यांना नानाविध आमिष दाखवून पोलिसांत जाऊ नका, असे सांगत आहेत. संपूर्ण चिखलीसह मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यांतही या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती आहे.सर्व शेतकरी गरीब असून, त्यांच्या कष्टाचा पैसा परत मिळवून देणे ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची जबाबदारी आहे. रनमोडे व त्याच्या साथीदारांची मालमत्ता जप्त करून या शेतकर्‍यांचे पैसे त्यांना देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

रविकांत तुपकरांनी पुढाकार घेतला म्हणून गुन्हे दाखल
जवळपास ५०० ते ६०० शेतकरी रनमोडे या भामट्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयांना फसले आहेत. याबाबत शेतकर्‍यांनी स्थानिक आमदार व पालकमंत्र्यांकडे धाव घेतली होती. परंतु, यापैकी कुणीही शेतकर्‍यांच्या मदतीला धावले नाही, की गुन्हे दाखल करून रनमोडे व त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण केला नाही. त्यामुळे पीडित शेतकरी हे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे गेले. त्यांनी तातडीने या शेतकर्‍यांना घेऊन जिल्हाधिकार्‍यांचे दार ठोठावले. पोलिस अधीक्षकांशीही चर्चा केली. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने तातडीने हालचाली करून, अखेर आठवडाभरानंतर रनमोडे या भामट्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या ४०६, ४०९, ४२०, १२० (ब) व ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. गुन्हे दाखल करण्यास सुरुवातीला दिरंगाई करणार्‍या चिखली पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास काढून घेण्यात आला असून, आर्थिक फसवणुकीचा व साडेतीन कोटींपेक्षा जास्त रकमेचा गुन्हा असल्याने तो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.

मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी उठविला आवाज
रनमोडे हा शेतमाल घेऊन पळून गेल्यानंतर पीडित शेतकरी हे मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांच्याकडे आले होते. त्यांवर पाटील यांनी तातडीने वरिष्ठ राजकीय नेतृत्वाशी चर्चा करून याबाबत त्यांना माहिती दिली. शेतकर्‍यांना चिखली व अंढेरा पोलिस ठाण्यांत घेऊन जात, त्यांना तक्रारी दाखल करण्यास सांगितल्या. दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनाही याबाबत माहिती दिली. त्यानुसार, पोहरे हे स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी बोलले व त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही व शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा पैसा मिळाला नाही तर, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रकाशभाऊ पोहरे यांनी दिला होता.
———————

Share This Article
Exit mobile version