अज्ञात वाहनाने उडविले, अंत्री कोळीचा तरुण ठार

editor 2 Min Read
2 Min Read

चिखली (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील अंत्री कोळी येथील धीरज विजय अंभोरे (वय २१) या तरुणाला काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना, साकेगाव रोडवरील अनुराधा शाळेच्या जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन उडविले. या भीषण अपघातात या तरुणाचा मृत्यू झाला असून, अंत्री कोळी येथील अंभोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी येथील धीरज विजय अंभोरे (वय वर्ष २१) हा शेती व ट्रॅक्टर चालविणे हा व्यवसाय करत होता. काही कामानिमित्त आपल्या ट्रॅक्टर मालकाच्या मोटरसायकल एमएच २८बीपी ६१०६ ने तो अंत्री कोळीवरून चिखलीकडे जात असताना, काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धीरज अंभोरे याला उडवून देऊन अज्ञात वाहन पसार झाले. सदर घटना चिखली-साकेगाव रोडवर अनुराधा शाळेच्या बाजूला घडली.

घटनेची माहिती मिळताच अंत्री कोळी व साकेगाव येथील उपसरपंच देविदास लोखंडे, समाधान हिवाळे, अनिल हिवाळे, विशाल डुकरे, भारत वाघ, समाधान मोरे, रामदास गाडेकर, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे प्रतिनिधी महिंद्र हिवाळे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत, १०८ नंबर वर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली व पोलिसांनादेखील माहिती दिली. शासकीय रुग्णवाहिकेने चिखली येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनवटे यांनी धीरज अंभोरे याला तपासून मृत घोषित केले. धीरज हा घरातील सर्वात लहान होता, त्यामुळे तो अंभोरे परिवारात लाडका होता. त्याला दोन भाऊ, आई, वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यामुळे धीरजच्या अपघाती निधनाने अंभोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, अंत्री कोळी व परिसरातदेखील दुःखाचे सावट पसरलेले आहे.
—————–

Share This Article
Exit mobile version