बुलडाणा- दहावीचा ऑनलाईन निकाल आज शुक्रवार 17 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. यावेळीही मुलीच अमरावती विभागासह जिल्हयात बाजी मारली आले. अमरावती विभागाच्या निकालाची टक्केवारी 96.81 टक्के लागला असून वाशिम जिल्ह्याचा निकाल 97.62 टक्के लागला असून प्रथमस्थानी आहे. तर बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 97.16 टक्के लागला असून द्वितीयस्थानी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 248 शाळांनी शंभरी गाठली असून जिल्ह्याचा श्रेणीनिहाय टक्केवारी 96.39 एवढी आहे. ऑनलाईन निकाल लागताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला, तर गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे शिक्षक व संस्थाध्यक्षांनी पुष्पगुच्छ देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
15 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेसाठी ३८ हजार २५२ एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३७ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ३६ हजार ८११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २० हजार ८३६ मुलांपैकी २० हजार १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ९६.५७ टक्के आहे. तर १७ हजार ४९ मुलींनी परिक्षा दिली होती, त्यापैकी १६ हजार ६८८ विद्यार्थीनी पास झाल्या असून त्याची टक्केवारी ९७.८८ टक्के एवढी आहे. मुलांपेक्षा यावर्षीही मुलींची टक्केवारी जास्त आहे. विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील 518 परिक्षा केंद्रावर परिक्षा दिली होती. जिल्ह्यातील 248 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्ह्यात ९३७ रिपीटर विद्यार्थ्यांना परिक्षा दिली होती, त्यापैकी ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्याची टक्केवारी ६५.३१ टक्के एवढी आहे. यामध्ये मुलींची टक्केवारी ६९.२८ टक्के एवढी असून मुलांची टक्केवारी ६३.६२ टक्के एवढी आहे. चिखली तालुक्यातील सर्वात जास्त 36 शाळांचा 100टक्के निकाल लागला असून त्या पाठोपाठ खामगाव तालुक्यातील 35 शाळांनी सुध्दा शंभरी गाठली आहे. तर 100 निकालामध्ये बुलडाणा तालुका तृतीयस्थानी असून 33 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे.
असा आहे तालुकानिहाय निकाल..
बुलडाणा तालुक्याचा निकाल 97.19 टक्के लागला आहे, तर मोताळा तालुक्याचा निकाल 96.66 टक्के एवढा, चिखली तालुका 97.61 टक्के, देऊळगाव राजा तालुका 98.22 टक्के, सिंदखेड राजा 98.38 टक्के, लोणार तालुका 96.51 टक्के, मेहकर तालुका 97.94 टक्के, खामगाव तालुका 96.45 टक्के, शेगाव तालुका 97.09 टक्के, नांदूरा तालुका 95.30 टक्के, मलकापूर तालुका 98.57 टक्के, जळगाव जामोद 95.63 टक्के, संग्रामपूर तालुका 96.34 टक्के एवढा निकाल लागला असून जिल्हयाचा सरासरी निकाल 97.16 टक्के निकाल लागला आहे.

