– यूपी, बिहार, तेलंगणामध्ये रेल्वे जाळल्या, २ ठार
– सिंकदराबादमध्ये जळत्या रेल्वेतून ४४ प्रवाशांचा थरारक बचाव
– केंद्राच्या अग्निपथ कंत्राटी लष्करी भरतीविरोधात उत्तर भारत पेटून उठला
नवी दिल्ली/ पाटणा (विशेष प्रतिनिधी) – केंद्रातील मोदी सरकारने लष्करी भरतीसाठी अग्निपथ ही कंत्राटी योजना आणली. या योजनेला विरोध करण्यासाठी ११ राज्यांतील तरुणाई रस्त्यावर उतरली असून, हिंसाचार करत सुटली आहे. उत्तर प्रदेश, बिहार व तेलंगनामध्ये रेल्वेला आगी लावण्यात आल्या. बिहारमधील सासाराम येथे आंदोलकांनी भाजप कार्यालयात तोडफोड करत जाळपोळ केली. या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी बिहार सरकारने पोलिस उपाधीक्षक (डीएसपी) संतोषकुमार राय आणि एसडीएम मनोज कुमार यांना तैनात केले होते. मात्र आंदोलकांच्या संख्येपुढे हतबल डीएसपी आणि एसडीएम यांना कार्यालयाच्या संरक्षक भितींवरुन उड्या मारुन पळावे लागले.
बिहारच्या बेतियामध्ये उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावरदेखील हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली व वाहनांची तोडफोड केली. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय जयस्वाल आणि भाजप आमदार विनय बिहारी यांच्या घरावरही आंदोलकांनी हल्लाबोल करत, दगडफेक केली. घरात घुसून तोडफोड करण्याचे प्रयत्न झालेत. डॉ.संजय जयस्वाल यांचे म्हणणे आहे की, ‘पोलीस वेळेवर आले नसते. तर त्यांचे घर पेट्रोल टाकून जाळले गेले असते.
तेलंगणात सिकंदराबाद येथे रेल्वेची जाळपोळ करण्यात आली. एका कोचला आग लावण्यात आली असता, त्यात ४० प्रवासी होते. या प्रवाशांना मोठ्या शिताफीने बाहेर काढण्यात आले. आग्रा-लखनऊ महामार्गावर रस्तारोको करत आंदोलकांनी चार बसेस पेटवून दिल्या. कोणत्याही परिस्थितीत कंत्राटी लष्करी भरती बंद करावी, अशी मागणी आंदोलक तरुण करत आहेत. हातात तिंरगा घेऊन तरुणवर्ग रस्त्यावर उतरला आहे.

