संगमनेर जिल्हा अहमदनगर:- (संदीप चव्हाण) :- गेल्या वर्षभरापासून चोर आणि पोलिसांमध्ये सुरू असलेला लपंडावाचा हा खेळ अखेर गुरुवारी 16 जून रोजी रात्री संपुष्टात आला. उपअधीक्षक मदने यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ज्या चोरट्यांभोवती खबर्यांचे वलय निर्माण केले होते त्या वलयातून कंप जाणवू लागला आणि खबर्याचा फोन खणाणला. गुंजाळवाडी शिवारात गुंजाळांच्या घरासमोर अमुकतमूक ट्रॅक्टर व ट्रॉली उभी असून ती चोरीचीच असण्याचा दाट संशय माहिती देणार्या खबर्याने व्यक्त केला. त्यानुसार उपअधीक्षकांनी आपल्या पथकाला पाचारण करीत आवश्यक त्या सूचनांसह कारवाईचे आदेश दिले आणि पोलिसांनी मालवाहतूक वाहनांची चोरी करणारी टोळी गजाआड करून साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक वेल्हाळेे रस्त्यावरील विजय उर्फ सोनू रावसाहेब गुंजाळ (वय 22, रा.गुंजाळवाडी) याच्या घराजवळ पोहोचले असता मिळालेल्या माहितीनुसार वर्णनाचा ट्रॅक्टर व ट्रॉली तेथे उभी असल्याचे त्यांना दिसले. या प्रकरणात आरोपीचे नावही समोर आलेले असल्याने पोलिसांनी नेमक्या व्यक्तीचा माग काढीत त्याच्यावर झडप घातली. यावेळी त्याला दारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तेथेच पोलिसी खाक्या दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला. सदरील ट्रॅक्टर वर्षभरापूर्वी जोर्वे नाक्यावरुन चोरल्याची कबुली देत आणखीही काही गुन्हे केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या कृत्यात आणखी कोणाचा सहभाग आहे असे विचारता त्याने जवळे कडलग शिवारातील वडगाव लांडगा रस्त्यावर राहणार्या अनिकेत उद्धव कडलग (वय 25) याचेही नाव सांगितल्यानंतर पथकाने गुंजाळवाडी शिवारातून विजय गुंजाळ याला ताब्यात घेवून त्याच्या घराजवळील ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केले.

