तीन कोटींचा आकडा ऐकून आ. संजय रायमुलकर यांनाही बसला धक्का!

editor 2 Min Read
2 Min Read

– अधिकार्‍यांच्या करामती ऐकून आ. रायमुलकर, आ. काळे आश्चर्यचकीत
– शासनाचा निधी योग्यरित्या खर्च होतो की नाही हे पाहणे आमचे काम : अध्यक्ष संजय रायमुलकर

सोलापूर : संदीप येरवडे
शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या की नाही, हे पाहणे पंचायतराज समितीचे काम असल्याचे मत या समितीचे अध्यक्ष आ. संजय रायमुलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. गेल्या दोन दिवसांपासून पंचायतराज समिती सोलापूर दौर्‍यावर असून, या समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तपासणी केली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने, तुमच्या नावाने अधिकारी-कर्मचार्‍यांनी तीन कोटी रुपयांची वर्गणी गोळा केल्याचे अध्यक्ष संजय रायमुलकर, आ. विक्रम काळे यांना सांगताच, या दोघांनाही धक्का बसला. काळे यांनी तर चक्क कानाला हात लावले. ही आमच्या नावाने पावती फाडण्याचा प्रकार असल्याचे मत आ. रायमुलकर यांनी व्यक्त केले.
पंचायतराज समिती सोलापूर दौर्‍यावर असल्याने, या दौर्‍यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी, अधिकार्‍यांकडून वर्गणी गोळा केली गेल्याची चर्चा मागील दोन-तीन दिवसांपासून रंगली होती. समितीच्या दौर्‍यातील शेवटच्या दिवशी अध्यक्ष संजय रायमुलकर, आमदार विक्रम काळे, आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांचीदेखील उपस्थिती होती.
याचवेळी एका पत्रकाराने पंचायतराज समितीसाठी अधिकारी-कर्मचार्‍यांकडून गोळा केलेली वर्गणी ही तब्बल तीन कोटीपर्यंत गेली असून, तुमच्या नावावर ते सर्व केले जाते, अशी माहिती पंचायतराज समितीला दिली. त्यावर बापरे तीन कोटी? असे म्हणून आमदार विक्रम काळे यांनी कानाला हात लावले. तर आकडा ऐकायला चांगला वाटतो; परंतु ही वस्तुस्थिती आहे का? की आमच्या नावावर तिकिटे फाडली जात आहे? असे या प्रसंगी अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी सांगितले. या समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजाची, खर्च झालेल्या निधीची सखोलतेने चौकशी करत, माहिती घेतली. कोणत्या कामचुकार अधिकार्‍यावर समितीची वक्रदृष्टी पडणार? अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती.

Share This Article
Exit mobile version