– पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत बुलडाणा मतदारसंघ जिंकण्यासाठी रणनीती निश्चित
– प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच राहणार राजकीय आव्हान
पुरुषोत्तम सांगळे
बुलडाणा : राज्यातील शिवसेनेच्या सर्व लोकसभा जागांना ‘टार्गेट’ करण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने आखली आहे. त्यासाठी पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत ‘सूक्ष्म नियोजन’देखील झाले आहे. त्यानुसार, बुलडाणा लोकसभा मतदारसंघात विनिंग वँâडिडेट (winning candidate) म्हणून ओळखल्या जाणार्या विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची जागा धोक्यात आली आहे. महाआघाडीविरुद्ध भाजप अशी लढत झाली तर प्रतापराव पुन्हा उमेदवारी करू शकतात. परंतु, त्यांच्याविरोधात कोण? हा प्रश्न भाजपसमोर तूर्त असला तरी, वरिष्ठ सूत्राच्या माहितीनुसार, भाजपने आगामी उमेदवार हेरून ठेवलेला आहे. त्याला आतापासून राजकीय ताकद पुरवण्यास सुरुवात झाली आहे. बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे, बुलडाणा हा जिल्हा मातृतीर्थ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यातून स्त्रीशक्तीलाच लोकसभेत पाठविण्याचे ठरलेच तर चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेतही दिसू शकतात, असे या सूत्राचे म्हणणे आहे.
खरे तर पूर्वी जनसंघाच्या काळात बुलडाणा हा मतदारसंघ भाजपकडेच होता. १९८९ मध्ये सुखदेव नंदाजी काळे हे भाजपकडून निवडून गेले होते. १९९१ मध्ये पी. जी. गवई यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती. परंतु, १९९६ मध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहाखातर हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागला होता. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ येथे सातत्याने खासदार झालेत. मतदारसंघ खुला झाल्यानंतर ती संधी मेहकरचे तत्कालिन आमदार व माजी राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना शिवसेनेने दिली. ते आजतागायत खासदार आहेत. परंतु, महाविकास आघाडीच्या राजकीय प्रयोगानंतर राज्याचे समिकरण बदललेले आहे. जिल्ह्याच्या राजकीय समिकरणातही उलथापालथ झालेली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले प्रतापराव जाधव व राजेंद्र शिंगणे हे दोन सोयरे आता महाआघाडीचे घटक आहेत. तर प्रतापराव यांच्यासाठी मागीलवेळी मतदान मागणारा भाजप आता त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्याची तयारी करत आहे.
शिवसेनेत प्रतापराव जाधव यांनी नेहमीच विजयराज शिंदे यांच्यासाठी गॉडफादर म्हणून भूमिका पार पाडली. मातोश्रीवरचे आपले वजन ते शिंदे यांच्यासाठी खर्ची करत होते. तेच विजयराज शिंदे आता प्रतापराव जाधव यांच्याविरोधात भाजपकडून दंड थोपाटू शकतात, आणि आपल्या या राजकीय गॉडफादरला पराभूतही करू शकतात, असे भाजपचे राजकीय गणित असल्याचे खात्रीशीर सूत्राचे म्हणणे आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने सर्व ताकद खर्ची घालण्याची रणनीती आखलेली आहे. भाजपकडून अनेक नावे पुढे येण्याची शक्यता असली तरी श्वेताताई महाले, संजय कुटे या आमदारांची नावे त्यात अग्रस्थानी आहेत. परंतु, हे आमदार लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यास इच्छुक नाहीत. माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांच्या नावाची चर्चा होत असली तरी, पक्ष त्यांचा विचार करेल की नाही, याची खात्री देता येत नाही. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात विजयराज शिंदे यांच्याऐवजी योगेंद्र गाडे यांना उतरविण्याचीच भाजपची राजकीय रणनीती निश्चित असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक ही विजयराज शिंदेविरुद्ध प्रतापराव जाधव अशीच रंगेल, असे तूर्त तरी राजकीय चित्र आहे. शेवटी राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ असतो. उद्या भाजपने आजी किंवा माजी खासदार, किंवा मंत्र्याला आयात केले तर तसाही राजकीय चमत्कार घडण्याची शक्यता या मतदारसंघात नाकारता येत नाही!

