दहावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी!

editor 3 Min Read
3 Min Read

राज्यातील १२,१२० शाळांचा निकाल १०० टक्के

पुणे (विशेष प्रतिनिधी) – कोरोनाच्या संकटावर मात करत यंदा इयत्ता दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, सावित्रीच्या लेकी हुशारच असल्याचे सिद्ध केले आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला असून, सकाळी ११ वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. आता थोड्याच वेळात, दुपारी १ वाजता सविस्तर निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहाता येणार आहे. राज्यातील १२,१२० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील २९ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल लागला आहे.

या निकालाचे वैशिष्य असे, की उत्तीर्ण मुलींचा ९७.९६ तर मुलांचा ९६.०६ टक्के इतका निकाल लागला आहे. गुणवत्तेत सरस असल्याचे मुलींनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिद्ध करून दाखवले. कोरोना काळात बहुतांश शाळा ऑनलाईन होत्या. तर ग्रामीण भागात तेही शिक्षण विद्यार्थ्यांना नशीब झाले नाही. तरीही यंदा चांगला निकाल लागला असून, परीक्षा देणार्‍या मुलांच्या तुलनेत १.०९ टक्के मुली जास्त उत्तीर्ण झाल्या आहेत.
राज्यात यंदा १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.२७ तर सर्वात कमी निकाल ९५.९० हा नाशिक विभागाचा लागला आहे.
यंदा राज्यात ९ विभागीय मंडळामार्फत १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा झाली होती. १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी राज्यभरातून या परीक्षेस बसले होते. विद्यार्थ्यांना गुणनिहाय निकाल पत्रिका ऑनलाईन देण्यात येत आहे. त्याची प्रिंटदेखील काढली जाणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुण पडताळणीसाठी अर्ज करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी सोमवार, २० जून ते बुधवार २९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी प्रति विषय ५० रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.  या प्रक्रियेसाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागणार आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण – ९९.२७ टक्के
कोल्हापूर – ९८.५० टक्के
लातूर – ९७.२७ टक्के
नागपूर – ९७ टक्के
पुणे – ९६.९६ टक्के
मुंबई – ९६.९४ टक्के
अमरावती – ९६.८१ टक्के
औरंगाबाद – ९६.३३ टक्के
नाशिक – ९५.९० टक्के

येथे पहा दहावीचा निकाल

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

Share This Article
Exit mobile version